नेदरलँडचा दिग्गज गौतम गंभीरच्या ताफ्यात; अभिषेक नायर सहाय्यक प्रशिक्षकपदी?, अखेर पत्रकार परिषदेत झाले स्पष्ट!
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पहिली पत्रकार परिषद घेतली.
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याच्या सपोर्ट स्टाफबद्दलही सांगितले.
गौतम गंभीरने स्पष्ट केले की, नेदरलँडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रायन टेन डोशेटचा देखील त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये समावेश केला जाऊ शकतो. याशिवाय त्याने सहाय्यक प्रशिक्षकाबाबतही खुलासा त्याने केला. श्रीलंका दौऱ्यानंतरच सपोर्ट स्टाफ निश्चित केला जाईल, असे गंभीरने स्पष्ट केले.
गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?
रायन टेन डोशेट आणि अभिषेक हे लोक आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. मला खेळाडूंसोबतच इतर लोकांबद्दल खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असं सांगत गौतम गंभीरने दोन जणांची नावं जवळपास निश्चित केल्याचं सांगण्यात येत आहे.
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?
श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांचे उत्तर दिले. विराट कोहली आणि रोहित शर्माकडे भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. विराट आणि रोहित दोघंही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. ते दोघं कोणत्याही संघात नक्कीच असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी असो, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका असो आणि दोघांची फिटनेस चांगली राहिल्यास 2027 चा विश्वचषकही ते खेळू शकतात, असं गौतम गंभीरने सांगितले.
सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक-
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली.
शुभमन गिलबाबत अजित आगरकर काय म्हणाले?
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलचे उपकर्णधार होणे चर्चेचा विषय बनले आहे. शुभमन गिल अवघा 24 वर्षांचा असून संघात त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडू आहेत. सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचे कर्णधारपद दिले असते, तरीही हार्दिकला उपकर्णधार बनवता आले असते, अशी चर्चा सुरु आहे. यावर देखील अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरात त्याने खूप गुणवत्ता दाखवली आहे, हे आम्ही ड्रेसिंग रूममधून ऐकतो. त्याने कर्णधारपदाचे काही चांगले गुण दाखवले आहेत. आम्ही त्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करू इच्छितो, असं अजित आगरकर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!