हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?; गौतम गंभीर अन् अजित आगरकरांनी पत्रकार परिषदेत सर्व सांगितले!
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: सूर्यकुमारला टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद देण्यात आलं. याचं कारण आज मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियाला सूर्यकुमार यादवच्या रुपात नवा कर्णधार मिळाला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची धुरा हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र सूर्यकुमार यादवला टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद देण्यात आलं. याचं कारण आज मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली.
Ajit Agarkar said, "Suryakumar Yadav was made captain because he is one of deserving candidates. He is one of best T20I batters. You want a captain who is likely to play all the games. Hardik Pandya's fitness has been a challenge for him". pic.twitter.com/gRraIvMrp1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 22, 2024
शुभमन गिलला उपकर्णधार का केले?
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वेचा मालिकेत 4-1 असा पराभव केला. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत शुभमन गिलचे उपकर्णधार होणे चर्चेचा विषय बनले आहे. शुभमन गिल अवघा 24 वर्षांचा असून संघात त्याच्यापेक्षा अनुभवी खेळाडू आहेत. सूर्यकुमारला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 संघाचे कर्णधारपद दिले असते, तरीही हार्दिकला उपकर्णधार बनवता आले असते, अशी चर्चा सुरु आहे. यावर देखील अजित आगरकर यांनी प्रतिक्रिया दिली शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरात त्याने खूप गुणवत्ता दाखवली आहे, हे आम्ही ड्रेसिंग रूममधून ऐकतो. त्याने कर्णधारपदाचे काही चांगले गुण दाखवले आहेत. आम्ही त्याला अनुभव देण्याचा प्रयत्न करू इच्छितो, असं अजित आगरकर यांनी सांगितले.