IND vs AUS : पहिल्यांदाच इंदूर कसोटीत भारत पराभूत, 3 पॉईंट्समध्ये समजून घ्या का पराभूत झाली टीम इंडिया
India vs Australia : भारताला इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच कसोटी सामना गमवावा लागला.
IND vs AUS, Indore Test : इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला (Team India) पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा टीम इंडियाचा पहिला कसोटी पराभव होता. यासोबतच रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली देखील भारताला पहिल्यांदाच कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. इंदूरमध्ये भारताच्या पराभवाचं सर्वात मोठे कारण खराब फलंदाजी हे होतं. यासोबतच खेळपट्टीच्या स्थितीचाही भारताच्या पराभवात महत्त्वाचा वाटा होता. या पराभवामुळे मालिकेत आता स्थिती 2-1 अशी असून भारताला या विजयासह WTC फायनल गाठता आली असती, पण आता भारताचं हे मिशन पुढील सामन्यावर अवलंबून आहे. दरम्यान या इतक्या महत्त्वाच्या सामन्यात भारत पराभूत झाला असून भारताच्या पराभवातील तीन महत्त्वाची कारण जाणून घेऊ...
खराब फलंदाजी
इंदूर कसोटीत भारताची फलंदाजीची फळी अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे विखुरली. संघातील दिग्गज खेळाडूही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गुडघे टेकताना दिसले. सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या डावात 12-12 धावा केल्यानंतर रोहित बाद झाला. पहिल्या डावात 21 धावा आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्यानंतर शुभमन बाद झाला. त्याचप्रमाणे विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. इतर फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाहीत आणि ज्यामुळे एक मोठं लक्ष्य भारत कांगारुंना देऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलियाचं धोकादायक गोलंदाजी आक्रमण
कांगारू संघाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने भारतीय फलंदाजांना घाम फोडला. त्याने पहिल्या डावात 35 धावांत 3 बळी घेतले. यानंतर त्याने दुसऱ्या डावात आणखी धोकादायक गोलंदाजी केली. लायनने 23.3 षटकांत 64 धावांत 8 बळी घेतले. तो भारतीय संघासाठी सर्वात धोकादायक ठरला.
भारताच्या पराभवात खेळपट्टीचा महत्त्वाचा वाटा
इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी (Indore Cricket Stadium) भारतासाठी एक फार तोट्याची ठरली. इथे पहिल्या दिवसापासून गोलंदाजांना भरपूर टर्न मिळत होता. यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर खराब झाली. रोहित, विराट, शुभमन आणि अय्यरसह एकही खेळाडू टिकू शकला नाही. पुजाराने दुस-या डावात खूप मेहनत घेऊन अर्धशतक झळकावले असले तरी त्याला साथ न मिळल्याने भारत मोठं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला देऊ शकला नाही.
हे देखील वाचा-