IND vs AUS : इंदूर कसोटीत उमेश यादवची विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी, युवराज-रवी शास्त्रीसारख्या दिग्गजांनाही टाकलं मागे
Umesh Yadav : इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात उमेश यादवनं 17 धावा करताना दोन षटकारही ठोकत, खास रेकॉर्डही केला.
IND vs AUS, Umesh Yadav : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना बुधवारपासून इंदूरमध्ये सुरू झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या 109 धावांवर ऑलआऊट झाली. ज्यानंतर 197 वर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली असून आता भारत आपला दुसरा डाव खेळत आहे. दरम्यान भारताचे फलंदाज पहिल्या डावात खास कामगिरी करु न शकल्याने भारत सामन्यात पिछाडीवर आहे. पण एकीकडे भारताचे टॉप फलंदाज फारच स्वस्तात तंबूत परतले असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने 13 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 17 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. यामुळेच भारत 100 पार जाऊ शकला तसंच ही खेळी उमेशसाठी खूप खास होती कारण त्याने या खेळीतून दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
विराट कोहलीच्या षटकारांची बरोबरी
तिसर्या कसोटीत फलंदाजी करताना उमेश यादवने दोन शानदार षटकार ठोकले. आपल्या शानदार षटकारांच्या जोरावर त्याने युवराज सिंग आणि माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांना मागे टाकताना रन मशीन कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. उमेशने दोन षटकार मारल्याने त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील 24 षटकार झाले. विराट कोहलीनेही कसोटीत भारतासाठी इतकेच षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे उमेशने युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावे अनुक्रमे 22-22 षटकार आहेत.
आतापर्यंत काय-काय झालं?
सर्वात आधी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं. ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला. यावेळी मॅथ्यू कुहनेमनने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली. मग ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं.दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले होते. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी सुरु केली 156 वर डाव सुरु केल्यावर 186 धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. पण त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि 186 वर पाचवी विकेट पडल्यावर 197 तर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गडी केवळ 11 धावांमध्ये तंबूत परतले. आता लंचब्रेकपर्यंत भारत 13 धावांवर शून्य बाद अशा स्थितीत होता.
हे देखील वाचा-