India vs Australia 4th Test: शमी IN... मोहम्मद सिराज OUT; अहमदाबाद कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग-11
India vs Australia 4th Test: टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलिया संघांमधील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज सामन्याला उपस्थित राहणार आहेत.
India vs Australia Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Team Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS 4th Test) शेवटचा सामना आजपासून (9 मार्च) अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad Narendra Modi Stadium) खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या मालिकेत 2-1 नं आघाडीवर असून हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न आज टीम इंडिया करताना दिसेल. हा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यावरच टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (ICC World Test Championship) भविष्य ठरणार आहे. या सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली, तरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला सुरूवात होणार आहे.
प्लेइंग-11 मध्ये बदल जवळपास निश्चित
अहमदाबाद कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग-11कडेही क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघात एक बदल करण्यात आल्याचं दिसतंय. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळणार असेल तर मात्र मोहम्मद सिराजला संघाबाहेर रहावं लागणार आहे.
अक्षर पटेलही प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर?
भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे या सामन्यात संघात अतिरिक्त फलंदाज ठेवण्याचीही चर्चा आहे, पण खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्यास 20 विकेट घेण्यासाठी पाच गोलंदाजांची गरज भासेल. अक्षर पटेलनं या कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीनं छाप पाडली असली तरी गोलंदाजीत तो केवळ एकच बळी घेऊ शकला आहे. विकेटकीपर केएस भरतलाही आतापर्यंत फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही, पण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या विभागांत कोणत्याही बदलाच्या बाजूनं असल्याचं दिसत नाही.
नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार
भारतीय क्रिकेट संघाला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळताना पाहण्यासाठी अनेक चाहते उपस्थित राहणार आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक लाख प्रेक्षक पोहोचतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाच्या खेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत. पीएम मोदी (PM Modi) आणि अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) सकाळी 8.30 वाजता स्टेडियमवर पोहोचणार आहेत. यादरम्यान दोन्ही दिग्गज नेते टीम इंडिया आणि टीम ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भेटतील. तसेच खास रथातून स्टेडियमचा फेरफटका मारतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आणि अल्बानीज मॅचदरम्यान कॉमेंट्रीही करू शकतात.
कोहली-पुजारा यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा
या सामन्यात कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या मालिकेत विराट कोहलीनं आतापर्यंत 111 धावा केल्या आहेत. तर चेतेश्वर पुजारानं 98 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून 207 धावा झाल्या आहेत. टीम इंडियानं प्रथम फलंदाजी केल्यास सुरुवातीचे सत्र खूप महत्त्वाचे असेल. इंदूर कसोटी सामन्यात टीम इंडिया पहिल्याच सत्रात गडगडली होती आणि त्यानंतर सामन्यात पुनरागमन करणं फारच कठीण झालं होतं.
ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचं तर ते ऑफस्पिनर टॉड मर्फीला वगळून स्कॉट बोलँड किंवा लान्स मॉरिसला संधी देऊ शकतात. ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आधीच आपली जागा निश्चित केली आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ हा सामना जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचं लक्ष्य ठेवणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नमॅन.
महत्त्वाच्या इतर बातम्या :