IND vs AUS, 3rd Test : भारतीय संघावर पराभवाचं सावट, 163 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 76 धावाचं माफक लक्ष्य
India vs Australia Indore Test: इंदूर कसोटीत भारताचा दुसरा डाव 163 धावांवर आटोपला असून यावेळी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनने तब्बल 8 गडी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावा करायच्या आहेत.
IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीदेखील गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं. आधी इंग्लंडचे 6 गडी बाद झाल्यावर भारताचा संपूर्ण संघही 163 धावांत गारद झाला आहे. ज्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावा करायच्या आहेत. सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारतानं 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून आता तिसऱ्या दिवशी 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे.
Stumps on day two 🏏
— ICC (@ICC) March 2, 2023
Nathan Lyon ran through India's batting lineup and registered a brilliant eight-wicket haul 👌#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/FFaPxt9fIY pic.twitter.com/PCAUqw8HVS
आतापर्यंत सामन्यात काय-काय झालं?
सर्वात आधी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं. ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109 धावांवर भारताचा डाव आटोपला. यावेळी मॅथ्यू कुहनेमनने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. भारताकडून शुभमन गिल (21 धावा) आणि विराट कोहली (22 धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मग ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं. पहिला दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले होते. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी सुरु केली 156 वर डाव सुरु केल्यावर 186 धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. पण त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि 186 वर पाचवी विकेट पडल्यावर 197 तर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गडी केवळ 11 धावांमध्ये तंबूत परतले.
पुजाराची एकहाती झुंज
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाल्यावर भारत एक मोठी धावसंख्या करुन ऑस्ट्रेलियाला तगडं लक्ष्य देईल असं वाटत होतं. पण पहिल्या डावाप्रमाणे यावेळीही भारताचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. केवळ टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 59 धावा केल्या. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान 163 इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. आता भारत आधीच 88 धावांच्या पिछाडीने खेळत असल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 76 धावाचं माफक लक्ष्य मिळालं आहे.
हे देखील वाचा-