Ind vs Aus 2nd Test : पहिल्याच सामन्यात ज्यानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, तोच टार्झन खेळाडू टीम इंडियातून बाहेर, दुसऱ्या सामन्यात कोणाला संधी?
पर्थ जिंकला, आता ॲडलेड जिंकण्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे.
India vs Australia 2nd Test : पर्थ जिंकला, आता ॲडलेड जिंकण्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. त्याच्या तयारीची पहिली चाचणी कॅनबेरा येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत शनिवार 30 नोव्हेंबरपासून दोन दिवसीय सराव सामना सुरू होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचा सामना पंतप्रधान इलेव्हनशी होणार आहे, जो डे-नाईट असेल. कारण 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असला तरी पहिल्याच सामन्यात पदार्पण करणाऱ्या हर्षित राणावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. ज्याने पर्थमध्ये छाप पाडली पण त्याला दुसऱ्या कसोटीत बाहेर बसावे लागू शकते.
युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात पर्थ कसोटीने केली. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर त्याला खेळवण्याचा निर्णय योग्य ठरला आणि तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांसाठी अडचणीचा ठरला. त्याने पहिल्या डावातच ट्रॅव्हिस हेडची अत्यंत महत्त्वाची विकेट घेत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 104 धावांवर रोखण्यात मोठी भूमिका बजावली. हर्षितने ३ बळी घेतले होते. मात्र, दुसऱ्या डावात तो खाही खास करू शकला नाही. कारण जेव्हा खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली झाली होती, त्याच्या अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली.
अशा स्थितीत आता तो ॲडलेड कसोटीत खेळणार का? कॅनबेरा येथे होणाऱ्या सराव सामन्यातून टीम इंडिया काय विचार करते हे कळू शकते. डे-नाईट कसोटी सामन्यात वापरण्यात आलेला पिंक बॉल आणि ॲडलेडच्या खेळपट्टीवर हर्षितच्या गोलंदाजी शैलीशी तुलना केली, तर ते जुळलेले दिसत नाहीत. हर्षितमध्ये प्रामुख्याने शॉर्ट ऑफ लेंथ किंवा शॉर्ट पिचवर गोलंदाजी करून फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे. पर्थ कसोटीतही त्याची हीच भूमिका होती. पण ॲडलेडमध्ये त्याची गरज कमी असेल.
ॲडलेडमध्ये कोणाला मिळणार संधी?
पिंक बॉलला रेड बॉलपेक्षा जास्त स्विंग आणि सीम असतो. विशेषतः संध्याकाळी या चेंडूची हालचाल अधिक दिसून येते. अशा परिस्थितीत, प्रत्येक संघाचे वेगवान गोलंदाज प्रामुख्याने चेंडू थोडा पुढे पिच करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून फलंदाजाला स्विंग किंवा सीममधून चुकवता येईल. साहजिकच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यासाठी सक्षम आहेत. आता, जर टीम इंडियाला ॲडलेडमध्ये 3 आघाडीच्या वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे असेल, तर ते या भूमिकेत आकाश दीपचा वापरू करू शकतात, ज्याची गोलंदाजीची शैली सारखीच आहे आणि त्याला पिंक बॉल अधिक आवडू शकतो. अशा परिस्थितीत हर्षितला केवळ एका टेस्टनंतर बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.