CWG 2022: भारतीय संघापुढं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान, पाहा दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी
India vs Australia Head to Head Record: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे आजपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
India vs Australia Head to Head Record: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे आजपासून कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22 व्या हंगामात पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय. या स्पर्धेतील पहिला क्रिकेटचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. यापूर्वी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यातील टी-20 सामन्यात कोणाचं पारडं जडं राहिलंय? हे पाहुयात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागील पाच टी-20 सामन्यावर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलियाचं पारडं जडं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या मागील पाच टी-20 सामन्यात भारताला चार वेळा पराभव स्वीकारावा लागलाय. तर, फक्त एका सामन्यात यश मिळवलंय. या पाच सामन्यांमध्ये मार्च 2020 मध्ये खेळला गेलेला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना देखील आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 184 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतचा संपूर्ण संघ 99 धावा करून सर्वबाद झाला होता.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या गटात कोणकोणते संघ?
कॉमनवेल्थ स्पर्धेत एकूण 8 क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघांना दोन गटात विभागलं गेलं आहे. भारत 'अ' गटात असून ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बारबाडोस संघाचा या गटात समावेश करण्यात आलाय. तर, 'ब' गटात इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांचा समावेश आहे. दोन्ही गटात पहिल्या दोन स्थानावर जे संघ असतील, त्यांना सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यानंतर 7 ऑगस्टला सुवर्ण आणि कांस्य पदाकासाठी सामने खेळले जातील.
कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल.
हे देखील वाचा-
- WI vs IND 1st T20: जाडेजाची दुखापत चिंता वाढवणारी, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी?
- WI vs IND T20: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, स्फोटक फलंदाजांचं संघात कमबॅक
- CWG 2022 Opening Ceremony: कॉमनवेल्थ स्पर्धेचा शुभारंभ; पीव्ही सिंधू, मनप्रित सिंहकडं भारतीय चमूचं नेतृत्व