एक्स्प्लोर
अर्जुन तेंडुलकर अंडर 19 संघात, जुलैमध्ये श्रीलंका दौरा
चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अर्जुनची भारतीय युवा संघात वर्णी लागली आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात झाली आहे.
पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या मालिकेसाठी या संघाची निवड करण्यात आली आहे.
भारतीय युवा संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 2 चार दिवसीय आणि 5 वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यापैकी चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अर्जुनची भारतीय युवा संघात वर्णी लागली आहे. पण वन डे संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही.
18 वर्षीय अर्जुन हा धरमशाला इथे नुकत्याच झालेल्या 25 खेळाडूंच्या सराव शिबिरात सहभागी झाला होता. या शिबिरातील कामगिरीच्या आधारावर भारताचा हा संघ निवडण्यात आला. दिल्लीचा विकेटकीपर फलंदाज अनुज रावतकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
अष्टपैलू म्हणून संघात अर्जुनची भूमिका महत्त्वाची असेल. फलंदाजीसोबतच डावखुरा जलदगती गोलंदाज म्हणून अर्जुनने चांगली कामगिरी बजावली आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील संघात खेळला आहे.
भारताच्या अंडर नाईन्टिन संघाचं प्रशिक्षकपद वूर्केरी रमणकडे देण्यात आलं आहे. राहुल द्रविड भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने अर्जुनचे नवे गुरुजी वूर्केरी रमण असतील.
खरंतर, अर्जुन सचिन तेंडुलकरचा लेक असल्यानं त्याच्या निवडीविषयी उलटसुलट चर्चा होत्या. पण गेल्या मोसमात अंडर नाईन्टिन कूचबिहार करंडकात एमसीएकडून खेळताना अर्जुनला 18 विकेट्स मिळाल्या होत्या. दोनदा त्याने डावात पाच विकेट्स, तर एकदा चार विकेट्स घेतल्या होत्या.
अर्जुनच्या निवडीवर सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुनच्या अंडर नाईन्टिन भारतीय संघात झालेल्या निवडीनं आम्ही आनंदित झालो आहोत. त्याच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. मी आणि अंजली, त्याच्या आवडीला नेहमी प्रोत्साहन देऊ आणि त्याला यश मिळावं म्हणून प्रार्थनाही करु, असं सचिन म्हणतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement