Yavatmal Crime : दोन चिमुकल्यांना विष पाजून आईने स्वत: लाही संपवलं; उमरखेड हादरलं
Yavatmal Crime : आईसह दोन्ही निरागस बालकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली.
उमरखेड, यवतमाळ: आईने आपल्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेतला आणि यात आईसह दोन्ही निरागस बालकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. रेश्मा नितीन मुडे (28)असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन मुडे (6) आणि सार्थक नितीन मुडे (3) असे या चिमुकल्यांचे नाव आहे.
आज, (14 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास रेश्मा मुडे यांनी आपल्या निरागस बालकांना आधी विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. काही वेळानंतर कुटुंबातील सदस्यांना ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्यांनी लगेचच आई रेश्मा आणि सार्थक, श्रावणी या तिघांनाही तातडीने सवना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. श्रावणीला पुढील उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नेमकं रेशमाने अचानकपणे इतके मोठे पाऊल का उचलले आणि आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. दरम्यान महागाव पोलीस ठाण्यात आई रेश्मा नितीन मुडे आणि सार्थक मुंडे, यांच्या मृत्यूप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला. तर श्रावणीचा मृत्यू पुसद येथील दवाखान्यात झाला त्यामुळे तिचा मृत्यूची नोंद पुसद पोलिसांनी घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान उमरखेड महागाव आणि पुसद येथील पोलीस विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत आहे.
नागपुरात 24 तासात दोन हत्या, दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीला संपवलं
नागपुरात गुन्हेगारी (Nagpur Crime) थांबण्याचं नाव घेत नाही. एकाच दिवसात चार हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, मागील 24 तासात पुन्हा दोन हत्येच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत हे खून झाले. दोन्ही घटनांमध्ये पतीने पत्नीचा खून केला. शिवाय दोन्ही हत्या या कौटुंबिक कारणावरुन झाल्याची माहिती आहे. दोन्ही घटनांमधील आरोपी पतींनी पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.