विधानसभेची खडाजंगी : यवतमाळमध्ये 2019 ला भाजप सेनेचं वर्चस्व, 2024 च्या लोकसभेला मविआची सरशी, विधानसभा निवडणुकीत काय होणार?
Yavatmal MLA List : यवतमाळ जिल्ह्यात 2019 च्या विधानसभेला महायुतीनं वर्चस्व मिळवलं होतं. 2024 च्या लोकसभेला मविआला आघाडी मिळाली आहे.
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मविआला 30 जागा मिळाल्या. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं 17 जागा मिळवल्या. सांगलीच्या जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले. विदर्भातील 10 जागांपैकी केवळ 2 जागा महायुतीला मिळाल्या तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राज्यातील मतदार कुणाला कौल देतात ते पाहावं लागेल. यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. या सात मतदारसंघांपैकी यवतमाळ, पुसद, दिग्रस, राळेगाव हे मतदारसंघ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येतात. उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. तर, वणी आणि आर्णी हे मतदारसंघ चंद्रपूर मतदारसंघात येतात. लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघांमध्ये काय झालं? 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये कुणी बाजी मारली तर कुणाला पराभवाचा धक्का बसला यासंदर्भातील माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वणी, राळेगाव , यवतमाळ , दिग्रस , अर्णी , पुसद आणि उमरखेड हे सात मतदारसंघ आहेत. यापैकी राळेगाव आणि अर्णी हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर, उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सात पैकी पाच जागांवर भाजपनं विजय मिळवला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक आणि शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळवलेला. भाजपनं वणी, राळेगाव, यवतमाळ, अर्णी आणि उमरखेड मतदारसंघात विजय मिळवला होता. शिवसेनेनं दिग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं पुसद मतदारसंघात विजय मिळवला होता.
यवतमाळ जिल्ह्यातील आमदारांची यादी (Yavatmal MLA List)
वणी :संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार (भाजप)
राळेगाव: अशोक रामाजी उईके (भाजप)
यवतमाळ : मदन येरावार (भाजप)
दिग्रस : संजय राठोड (शिवसेना)
अर्णी : संदिप धुर्वे (भाजप)
पुसद : इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
उमरखेड : नामदेव ससाणे (भाजप)
वणी विधानसभा मतदारसंघ (Vani Assembly Constituency )
वणी विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार 67710 मतं मिळवून विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या वामनराव कासावार यांना 39915 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार निळकंठराव डेरकर यांना 25045 मतं मिळाली होती. मनसेच्या राजू उंबरकर 16115 आणि वंचितच्या महेंद्र लोढा यांना 15489 मतं मिळाली होती.
राळेगाव विधानसभा मतदारसंघ (Ralegaon Assembly Constituency)
राळेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदासंघातून भाजपचे अशोक रामाजी उईके विजयी झाले होते. त्यांना 90283 मतं मिळाली होती. त्याच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या माजी मंत्री वसंत पुरके यांना 80948 मतं मिळाली होती. तर वंचितचे उमेदवार माधव कोहळे यांना 10705 मतं मिळाली होती.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ ( Yavatmal Assembly Constituency )
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचा निसटता विजय झाला होता. मदन येरावार यांना 80425 मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या अनिल मंगुळकर यांनी कडवी लढत दिली. त्यांना 78172 मतं मिळाली. या मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या वंचितच्या योगेश पारवेकर यांना 7930 मतं मिळाली होती.
दिग्रस विधानसभा मतदारसंघ (Digras Assembly Constituency )
दिग्रस विधानसभा मतदारसंघावर शिवसेना नेते कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. या मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राठोड विजयी झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव केला होता. संजय राठोड यांना 136824 मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांना 73217 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या तारिक लोखंडवाला यांना केवळ 6205 मतं मिळाली होती.
अर्णी विधानसभा मतदारसंघ (Arni Assembly Constituency )
अर्णी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमताी प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. भाजपच्या संदिप धुर्वे यांनी 81,599 मतं मिळवत निसटता विजय मिळवला होता. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांना निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अर्णी विधानसभा मतदारसंघातून त्यांना 78446 मतं मिळाली होती. या मतदारसंघात विरोधी मतांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फटका मोघे यांना बसला तर धुर्वे यांना फायदा झाला. अपक्ष उमेदवार राजू तोडसाम यांना 26949 मतं मिळाली. तर वंचितच्या निरंजन मेश्राम 12307 मतं मिळाली.
पुसद विधानसभा मतदारसंघ (Pusad Assembly Constituency )
पुसद विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. या मतदारसंघात 2019 पूर्वी मनोहर नाईक आमदार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवला. इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत 89143 मतं मिळवली. इंद्रनील नाईक यांनी भाजपच्या निलय नाईक यांना पराभूत केलं. निलय नाईक यांना 79442 मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार ज्ञानेश्वर बेळे यांना 11255 मतं मिळाली.
उमरखेड विधानसभा मतदारसंघ (Umarkhed Assembly Constituency )
उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात 2009 ला काँग्रेसनं विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 ला या मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले. भाजपच्या नामदेव ससाणे यांनी काँग्रेसच्या विजयराव खडसे यांचा पराभव केला. भाजपच्या नामदेव ससाणे यांना 87337 मत मिळाली. तर काँग्रेसच्या विजयराव खडसे यांना 78050 मत मिळाली होती. अपक्ष उमेदवार उमाजी विंकारे यांना 18248 मतं मिळाली होती. नामदेव ससाणे यांनी देखील निसटता विजय मिळवला होता.
शेतकरी आत्महत्या, कापूस आणि सोयाबीनचे पडलेले भाव, पावसाअभावी काही ठिकाणी रखडलेली पेरणी, बेरोजगारी, महागलेले शिक्षण असे अनेक प्रश्न यवतमाळ जिल्ह्यात आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत.गेल्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातून भाजप शिवसेना युतीला अधिक जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघापैकी 6 मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी होती. तर, केवळ एका मतदारसंघात महायुतीनं आघाडी मिळवली होती. आता विधानसभेसाठी राजकीय समीकरण कशी बदलणार हे देखील पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :