World Day Against Child Labour : आज साजरा केला जातोय जागतिक बालकामगार विरोधी दिवस, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
World Day Against Child Labour : जगभरात 12 जून हा बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातोय. जगभरातील बालमजूरी थांबावी आणि बालकांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
नवी दिल्ली : दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातोय. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 19 वर्षापूर्वी पुढाकार घेतला. 14 वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना कार्यरत आहेत.
आजही जगभरात, विशेषकरुन भारतासारख्या विकसनशील देश आणि इतर मागासलेल्या देशात बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांत बालकामगार विरोधी कायदे झाले असले तरी बालमजुरांच्या संख्येत म्हणावी तितकी घट झाली नाही. त्यावर जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे.
12-year-old Mohammad works as a luggage carrier at a railway station in Bangladesh.
— UNICEF (@UNICEF) June 11, 2021
Worldwide, the number of children in child labour has risen to 160M– an increase of 8.4M children in the last four years – with millions more at risk due to the COVID-19 pandemic. #EndChildLabour pic.twitter.com/hHzTvCjl9o
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीनं 2002 सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी जगभरातील शासकीय संस्था, अशासकीय सामाजिक संस्था, कामगार संघटना, नागरी समाज संस्थांच्या माध्यमातून बालमजुरांची संख्या कमी करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. जगभरातील बालमजुरांच्या स्थितीवर प्रकाश टाकला जातो. जगभरात अनेक लहान मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या बालपणाचा आनंद घेता येत नाही, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा अधिकार मिळत नाही, त्यापासून त्यांना वंचित रहावं लागतंय.
हा दिवस साजरा करताना दरवर्षी एक थीम निर्माण केली जाते. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 'कोरोना व्हायरसपासून बालकांचं संरक्षण' ही थीम निर्माण करण्यात आली असून येत्या वर्षभरात त्यासंबंधी काम केलं जाणार आहे.
जगभरातील बालकांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची युनिसेफ ही संघटना पुढाकार घेते. भारतातही युनिसेफ इंडिया ही संयुक्त राष्ट्रांची संघटना कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या :