(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चहा प्यायला उतरले आणि दोन मित्र बचावले; माळशेज घाटात कारवर दरड कोसळली!
कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात पार्क केलेल्या कारवर दरड कोसळली. कारमधील दोघेही जण चहा पिण्यासाठी उतरल्याने थोडक्यात बचावले. चहामुळे या दोघांचा जीव वाचला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
कल्याण : चहामुळे दोन जणांचा जीव वाचला, वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर काल (11 जून) एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची तल्लफ आली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली. त्यामुळे दोघेही अपघातातून बालंबाल बचावले.
मुसळधार पावसात माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणही जखमी झालं नाही अथवा जीवितहानी झाली नाही.
अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचला. यावेळी चहाची तल्लफ आल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली.
या दुर्घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला.
दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली.