Viral Video : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी व्हिडीओ लीक, ड्रग्जचे सेवन केल्याच्या विरोधकांचा आरोप
Sanna Marin : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हेलसिंकी: फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) यांच्यावर सध्या सोशल मीडियामध्ये टीकेडी झोड उठताना दिसत आहे. आपल्या मित्रांसोबतच्या एका पार्टीमध्ये बेभान होऊन त्या नाचतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फिनलँडमध्ये या व्हिडीओवरुन चांगलाच गदारोळ झाला असून अनेकांनी त्यांच्या या डान्सवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी यावेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सना मरिन या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. त्यामध्ये एक सेलिब्रेटीही दिसतोय. हे सर्वजण गाताना आणि नाचताना दिसत आहेत.
या व्हिडीओवरुन मरिन यांच्या राजकीय विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. मरिन यांनी या पार्टीच्या वेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. देशामध्ये अनेक मूलभूत प्रश्न असताना पंतप्रधान पार्टीमध्ये आणि ड्रग्जमध्ये व्यस्त असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
Finland’s Prime Minister @MarinSanna is in the headlines after a video of her partying was leaked today.
— Visegrád 24 (@visegrad24) August 17, 2022
She has previously been criticized for attending too many music festivals & spending too much on partying instead of ruling.
The critics say it’s not fitting for a PM. pic.twitter.com/FbOhdTeEGw
विरोधकांच्या या टीकेवर उत्तर देताना सना मरिन यांनी आपण ड्रग्जचे सेवन केलं नसल्याचं स्पष्ट केलं. या पार्टीवेळी आपण फक्त दारुचे सेवन केलं होतं आणि बेभान होऊन नाचल्याचं त्यांनी सांगितलं.
सना मरिन या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पार्टी प्रेम हे जगजाहीर असून या आधी त्यांनी अनेक पार्टीमध्ये भाग घेतल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सना मरिन या गेल्या वर्षी कोव्हिडची लागण झाल्यानंतरही क्लबमध्ये गेल्या होत्या. त्यावेळीही त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावर त्यांनी देशाची माफीही मागितली होती.
सना मरिन यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ हा गेल्या आठवड्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण नाचताना आपले शूटिंग होत असल्याचं त्यांना माहिती होतं, पण हा व्हिडीओ लिक झाल्याने आपल्याला वाईट वाटल्याचं त्या म्हणाल्या. मी नाचले, गाणं म्हटलं, पार्टी केली या गोष्टी कायदेशीर आहेत. त्यावेळी माझ्या ओळखीचे सर्व लोक होते, अनोळखी कोणीच नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सना मरिन या 2019 पासून फिनलँडच्या पंतप्रधान आहेत. सध्याच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे त्यांची आणि त्यांच्या पार्टीची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.