(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीनमध्ये कोरोनाच्या लसीकरणास सुरुवात, आतापर्यंत 5 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण
डॉक्टर्स, नर्स, आणि सैन्य दलातील लोकांवर याचा प्रथम वापर केला आहे.सीनोवॅक कंपनीच्या दाव्यानुसार नोव्हेंबरपर्यंत लस बाजारात आणणार.
चीनने कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण जरी मिळवले असले तरी याआधीच त्या देशात कोरोनाचे लसीकरण सुरू केले असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापासून करण्यात आलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमात आतापर्यंत किमान 5 लाख लोकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. त्यात मुख्यत: कोरोना विरोधात लढायला मदत करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, आणि सैन्य दलातील लोकांचा समावेश आहे असे एका वृत्तपत्राने म्ंहटले आहे.
अभ्यासासाठी परदेशात जायची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही यापुढे अशा प्रकारची लस मिळायला सुरवात झाली आहे. सीनोफार्म या एक लस तयार करणाऱ्या सरकारी कंपनीने अशा विद्यार्थ्यांना लस देण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारी कंपन्या ही लस त्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत देणार आहेत तर सिनोवॅक या कंपनीतर्फे या लसीचे दोन डोस 24 युरोंमध्ये उपलब्ध होतील.
या लसींचे काही दुष्परिणाम आहेत का? यावर आतापर्यंत कोणताही अभ्यास प्रकाशित झाला नाही. सीनोवॅकच्या दाव्यानुसार ही लस घेतल्यानंतर 1 ते 3 टक्के लोकांना काही प्रमाणात ताप आला तर 10 टक्के लोकांना काही प्रमाणात अंगात वेदना जाणवल्या. ही लस अजून प्रयोगाच्या स्वरुपात आहे. .या लसीला आतापर्यंत चीनच्या सरकारने किंवा जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत मान्यता दिली नाही. पण कंपनीला त्यांच्या या लसीच्या यशाबद्दल विश्वास आहे आणि त्यांनी असाही दावा केला आहे की लवकरात लवकर म्हणजे येत्या नोव्हेंबरपर्यंत ते त्यांची ही लस बाजारात आणतील.
चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण हा वुहान शहरात 1 डिसेंबर 2019 रोजी सापडला. त्यानंतर पहिल्या दोन ते तीन महिन्यांत ही रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. चीनसोबतच अमेरिका आणि युरोपला याचा मोठा फटका बसला. युरोप आणि अमेरिकेत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ झाली. चीनमध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या देशाने संपूर्णत: लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. मास्कचा वापर. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता असा वेगवेगळ्या प्रकारे चीनने त्या देशातील कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण आणले. आता या देशाला कोरोनावर जवळपास नियंत्रण मिळवण्यात यश मिळालय. एकेकाळी कोरोनाच्या संख्येत जगात पहिल्या क्रमांकावर असलेला चीन तुलनेनं आता खूपच मागे पडलाय.
वर्ल्डोमीटरच्या ताज्या आकडेवारीनुसार चीन कोरोना रुग्णांच्या संख्येत आता जगात 53 व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये आता केवळ 85,659 रुग्ण आहेत तर आतापर्यंत केवळ 4634 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण 16 कोटीच्य़ा वर कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहे .या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद 30 जानेवारीला केरळ राज्यात झाली. 24 मार्चला देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर भारतात कोरोना रुग्णांची गती सातत्याने वाढत गेली. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येतही वाढ होत गेली.