एक्स्प्लोर
शपथविधी झाला, मात्र नेमकं रात्री काय घडलं, राष्ट्रवादीचे प्रत्यक्षदर्शी आमदार सांगतात...
महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळी 8 वाजता मोठा धमाका झाला. पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून बोलावून घेतले. यातल्या काही आमदारांनी आपल्यासोबत दगाबाजी झाल्याचे सांगत शरद पवारांशी संपर्क करत रात्री घडलेली आपबिती सांगितली. काय घडलं नेमकं?

मुंबई : राज्यात आज सकाळी झालेल्या राजकीय भूकंपानंतर काल रात्री नेमकं काय घडलं असा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याआधी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करून बोलावून घेतले. यातल्या काही आमदारांनी आपल्यासोबत दगाबाजी झाल्याचे सांगत शरद पवारांशी संपर्क करत रात्री घडलेली आपबिती सांगितली.
बुलडाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, अजित पवार हे विधिमंडळाचे गटनेते आहेत. त्यांचा मला फोन आला. आपल्या नेत्यांचा फोन आला म्हणून मी बी 4 बंगल्यावर पोहोचलो. माझ्यासोबत आमदार नरहरी झिरवळ, संदीप क्षीरसागर, सुनील शेळके होते. रात्री 12 वाजता अजित पवार यांनी सांगितलं म्हणून सकाळी 7 ला बंगल्यावर गेलो. तिथं 8-10 आमदार आले. आम्हाला तिथून राजभवनवर नेण्यात आले. तिथे जाईपर्यंत आम्ही कशासाठी गेलो हे आम्हाला माहीत नव्हतं. काय चालंल आहे हे, कुणालाही माहीत नव्हतं. काही वेळात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील आले. नंतर राज्यपाल आले आणि लगेच शपथविधी झाला, असे शिंगणे यांनी सांगितले.
हे ही वाचा - Maharashtra Politics | त्याला प्रेम दिलं, मोबदल्यात काय मिळालं? : सुप्रिया सुळेचं व्हॉट्सअॅप स्टेटस
आम्हाला याची कल्पना नव्हती. आम्ही अस्वस्थ होतो. शपथविधी झाल्यावर आम्ही थेट पवारांच्या कडे गेलो. मी राष्ट्रवादी बरोबर आहे. गैरसमजुतीने आणि नेत्यांचा फोन आला म्हणून गेलो, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
अजित दादांनी फोन केला म्हणून आम्ही गेलो. शपथविधी झाल्यावर आम्ही पवार साहेबांकडे आलो. आम्हाला काहीही माहीत नाही. तिथे जे होते त्यांना काही माहीत नव्हतं. आमचा रक्तदाब वाढला होता. काहींनी आम्हाला फोन वरून सांगितलं, असे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, तिथं काय घडलं हे आम्हाला अजूनही माहिती नाही. अजित पवार हे पक्षाचे नेते आहेत म्हणून आम्ही तिथं पोहोचलो. याविषयी अजित दादांशी बोललो तर दादा म्हणाले पक्षाची भूमिका आहे. आम्हाला सुप्रियाताईंची पोस्ट पाहिल्यानंतर माहिती पडले की सत्य काय आहे. मी नंतर शरद पवार यांच्याशी बोललो. मी पक्षाशी प्रामाणिक आहे, मी पक्षाबरोबर राहील, असेही शेळके यांनी सांगितले.
संबंधित बातम्या -
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























