(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhasnagar News : दुचाकी टो होत असल्याचं दिसलं, मालक धाव गेला, पाय अडकून रिक्षावर आदळला, डोकं फुटून जखमी; उल्हासनगरमधील घटना
दुचाकी टो होत असल्याचं पाहून कर्मचाऱ्यांना थांबवण्यासाठी धावत गेलेल्या मालकाचं डोकं रिक्षावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना उल्हानगरमध्ये घडली आहे.
Ulhasnagar News : नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) निदर्शनास आलं तर ते वाहन टो केलं जातं. यादरम्यान वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडल्याचं अनेकदा दिसलं. गाड्या टोईंग (Towing) करणारे कर्मचारी अतिशय चपळाईने आणि वेगाने हे काम करतात. त्यामुळे वाहनचालकांना वाहन टो होऊ नये यासाठी काही प्रयत्न करताच येत नाहीत. असाच प्रकार मुंबईजवळच्या उल्हानगरमध्ये (Ulhasnagar) घडला. वाहतूक पोलीस दुचाकी टो करत असल्याचं पाहून त्यांना थांबवण्यासाठी धावत गेलेल्या मालकाचं डोकं रिक्षावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाली आहे.
दुचाकी टो होत असल्याचं दिसलं, मालक धाव गेला, पाय अडकून रिक्षावर आदळला
उल्हासनगर कॅम्प तीन मधील मोबाईल मार्केटच्या समोर असलेल्या मुख्य रस्त्यावर दुचाकी चालकाने पार्किंगच्या नियमांचं उल्लंघन करत ती पार्क केली होती. ही बाब निदर्शनास आल्यावर टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी टो केली. मात्र हे बघता तिथेच उभा असलेला दुचाकी मालक धावत गेला. मात्र त्याचा पाय अडकला आणि समोर उभ्या असलेल्या रिक्षावर डोकं आदळल्याने त्याचं डोकं फुटलं. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत असलेल्या या दुचाकी मालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
या परिसरात वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई
दरम्यान याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे या परिसरात वाहतूक विभाग सतत कारवाई करत असते. मात्र कारवाई करताना वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांची बाचाबाची आणि हाणामारीचे प्रकार घडले असून वाहतूक विभागावर वाहनचालक तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकदा ही कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप वाहन चालकाने केला आहे. मात्र वाहन टो करताना तिथे वाहन चालक आल्यास तात्काळ दंड आकारुन वाहन सोडून द्यावे असा नियम आहे. मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याने अशाप्रकारचे वाद निर्माण होत असतात.
हेही वाचा
Traffic Rules: कॉन्स्टेबल नाही लाऊ शकत मोठे दंड; फक्त 'यांचा' असतो अधिकार! जाणून घ्या हा नियम...