(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena : रश्मी ठाकरेंच्या हस्ते टेंभीनाका देवीची आरती, शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाका देवीची ओटी भरली आणि आरती केली, यावेळी शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत टेंभीनाका देवीची आरती केली. यावेळी महिला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा सामना टळला असून शिंदे गटाकडून रात्री 8 वाजता देवीची आरती करण्यात येणार आहे.
स्व. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका देवीचा नवरात्रोत्सव यंदा चांगलाच चर्चेत आला आहे. या देवीची आरती कोण करणार यावरुन वाद रंगला होता. त्यामुळे देवीच्या आरतीवरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा समोरासमोर येणार का असा सवालही विचारला जात होता. आता रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली आहे. तर शिंदे गटाकडून रात्री 8 वाजता आरती करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाचा सामना तूर्तास तरी टळल्याचं चित्र आहे.
शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन
रश्मी ठाकरे या टेंभीनाक्याच्या देवीच्या आरतीसाठी येणार असल्याने आज या ठिकाणी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये महिला शिवसैनिकांची संख्या अधिक होती. रश्मी ठाकरे यांनी या ठिकाणी आल्यानंतर पहिल्यांदा स्व. आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलं. त्यानंतर त्यांनी देवीच्या गाभाऱ्यात जाऊन त्यांनी देवीची ओटी भरली. त्यानंतर त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
रश्मी ठाकरे यांच्यासोबत यावेळी नगरसेविका नंदिनी विचारे आणि ठाण्यातील शिवसेना नेत्या अनिता बिरजे उपस्थित होत्या. त्यांनीही देवीच्या आरतीत भाग घेतला. रश्मी ठाकरेंच्या या भेटीवेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.
स्व. आनंद दिघे यांनी सुरुवात केली
टेंभीनाका देवीच्या उत्सवाची सुरुवात 1978 साली स्व. आनंद दिघे यांनी केली. तेव्हापासून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे. स्व. आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा सुरू ठेवली.
रश्मी ठाकरे संजय राऊत यांच्या घरी
टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनानंतर रश्मी ठाकरे या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी गेल्या. त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. रश्मी ठाकरे या ठिकाणी येणार असल्याने शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.