आनंद दिघेंना साक्षात्कार अन् देवीची स्थापना, टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचा इतिहास; असंही राजकीय महत्त्व
आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी खासकरुन सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची (Navratri 2022) परंपरा बंद पडू दिली नाही
Thane Tembhi Naka Durgeshwari Devi: ठाण्याच्या टेंभी नाका (Thane Tembhi Naka) इथली देवी यावर्षी सर्वात जास्त चर्चेत आहे आणि याचे कारण देखील शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेली उभी फुट हेच आहे. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या टेंभी नाका इथल्या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व त्यासाठीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. 1978 सालापासून या उत्सवाची सुरुवात स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी केली. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे.
दिग्गज नेत्यांची हजेरी, गरब्याला तुफान गर्दी
स्वतः आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. हळूहळू टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळू लागला. अगदी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, महापौर, हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेले आहेत. फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात. तीच परंपरा पुढे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील सुरू ठेवली होती. सुरुवातीला काहीही निर्बंध नसल्याने सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी गरबा सुरू असायचा. त्यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेपेक्षा जास्त गर्दी या गरब्याला होत असे.
आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंकडून परंपरा सुरु
2002 यावर्षी आनंद दिघे यांचे निधन झाले. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा उत्सव सुरू ठेवला. महत्त्वाचे म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची (Navratri 2022) परंपरा बंद पडू दिली नाही. त्यामुळे देवीच्या आगमनाला अष्टमीला आणि विसर्जनाला देखील एकनाथ शिंदे स्वतः हजेरी लावतात. मात्र यावर्षी त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन करून भाजप सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशी उभी फुट सर्व शिवसेनेमध्ये पडली आहे. त्यामुळे ठाण्यात देखील दहीहंडीनंतर देवीच्या या उत्सवात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अनेक वेळा आमने सामने आले आहेत.
देवीच्या उत्सवात राजकारण नको असे सांगून राजन विचारे यांच्या नेतृत्वातील ठाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या देवीच्या दर्शनाला आले. मात्र आज उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दरवर्षीप्रमाणे आरतीसाठी येणार असल्याची बातमी आल्याने पुन्हा एकदा दोन्ही गट आम्ही सामने येण्याची चर्चा रंगली आहे. कारण आजच्या संध्याकाळच्या आरतीचा मान शिंदे गटाच्या महिला आघाडीला देण्यात आला आहे. असे असले तरी रश्मी ठाकरे यांना आम्ही सन्मानाने वागणूक देऊ असे शिंदे गटाने सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Rashmi Thackeray:ठाण्यात ठाकरे गटाकडून देवीचा जागर,दिघेंच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती