डोंबिवलीमधील 27 गावांना मिळणार मुबलक पाणी, श्रीकांत शिंदे यांची माहिती
Dombivli : किमान 90 एमएलडी पाणी देण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
Dombivli : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत 27 गावांना उच्च दाबाने तसेच मुबलक पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. एमआयडीसी कडून शहराला 105 दशलक्ष लिटर पाणी देणे अपेक्षित असताना फक्त 60 दशलक्ष लिटर पाणी मिळत असल्याची बाब यावेळी उद्योग मंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर बोलताना उद्योगमंत्री सामंत यांनी कल्याण डोंबिवलीसाठी 90 दशलक्ष लिटर पाणी देणारच असे स्पष्ट केले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावामध्ये कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यापासून केल्या जात होत्या. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकाकडून खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे सातत्याने केली जात होती. यासह शहरातील पाण्याच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात उद्योगमंत्री सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे, एमआयडीसीचे पोपट मलिकनेर, विभागीय अभियंता सुधीर नागे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे तसेच शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधीनी शहरातील पाण्याच्या समस्या मांडल्या.
कल्याण डोबीवली पालिकेसाठी 105 दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. मात्र अवघा 60 दशलक्ष लिटर पाणी प्रत्यक्षात मिळते. त्यामुळे किमान 90 दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री सामंत यांनी तत्काळ निर्णय देत किमान 90 दशलक्ष लिटर पाणी ते सुद्धा उच्च दाबाने देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच एमआयडीसीकडून किती पाणी पुरवण्यात येते, त्याचा दाब किती असतो याची माहिती मिळण्यासाठी त्या ठिकाणी मिटर बसविण्याचे आदेश देखील मंत्र्यांनी दिले. अमृत योजनेत पाणी पुरवठा करण्यासाठी हेदूटणे, आणि कोळे येथे दोन नव्या जोडण्या देण्याची मागणी होती. त्यावर तत्काळ निर्णय उद्योग मंत्री सामंत यांनी देत या जोडण्याना परवानगी देण्याचे आदेश दिले.
एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योगांना पाणी देण्यात येते. मात्र रहिवाशांना पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता द्यायला हवी असे सांगत खासदार डॉ. शिंदे यांनी उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सेकंडरी प्रक्रिया केले जाणारे पाणी देण्याचा प्रस्ताव ठेवला. कल्याण पूर्वेतील पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून हे पाणी देण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी त्याचा सविस्तर अभ्यास आणि अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी सामंत यांनी दिले. त्यामुळे एमआयडीसीने प्रक्रिया केलेले किमान 40 दशलक्ष लिटर पाणी रहिवाशांना देता येईल. डोंबिवलीच्या देशमुख होम्स या गृह प्रकल्पाच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी एमआयडीसीच्या अधिकार्यांना करण्यात आली होती. त्यावर माहिती देताना औद्योगिक विभागाला होणार्या पाणी पुरवठ्यात वापरले जाणारे बुस्टर दोन तास बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.