आता WhatsApp वरूनही करता येणार पैसे ट्रान्सफर ; NPCI ने दिली परवानगी
व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. जून महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळाली होती. आतादेखील NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
व्हॉट्सअॅप यूपीआय वर जास्तीत जास्त 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन आपला यूपीआय यूजर बेस वाढवू शकतो, अशी माहिती NPCI ने दिली आहे. परंतु यासंदर्भात अद्याप व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. भारतातील व्हॉट्सअॅपचे युजर्स पाहता व्हॉट्सअॅप पेला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्व्हिस Google Pay आणि Paytm टक्कर देणार आहे.