5G Service : सावधान! 5G च्या नावाने हॅकर्सकडून गंडा, सायबर क्राईमच्या नवीन प्रकाराला बळी पडू नका !
5G Network Cyber Crime : 5G च्या नावाखाली सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्रकार शोधला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. या काय उपाय करता येईल, ते जाणून घ्या.
5G Cyber Crime Alert : नुकतंच भारतात 5G नेटवर्क (5G Network) लाँच झालं आहे. 4G पेक्षा अधिक वेगवान आणि इतरही अनेक सुविधा देणारं 5G तंत्रज्ञान नक्कीच कौतुकाचं आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये 5G अपडेट करण्यासाठी आतुर आहेत. हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्रकार शोधला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. यावर काय उपाय करता येईल, ते जाणून घ्या.
सायबर गुन्ह्याचा नवा प्रकार
तुमच्या मोबाईलमध्ये 5G सेवा सुरु करण्यातं सांगून तुम्हाला सायबर गुन्ह्याचा शिकार बनवण्याची हॅकर्सची नवी योजना आहे. 5G संदर्भात सायबर गुन्ह्याची अशी घटना तामिळनाडूमध्ये समोर आल्याची माहिती सायबर एक्सपर्ट ॲड. प्रशांत माळी यांनी दिली आहे. तुमच्या मोबाईलमधील 4G नेटवर्क अपग्रेड करून 5G करून घ्या, असं सांगणारा मेसेज किंवा कॉल तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करा, असं हॅकर्सकडून सांगण्यात येतं. अथवा सोबत दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती जाणून घ्या. यात ग्राहकांना संशय फारसा येत नाही. कॉलर तुम्हाला सांगतात त्याप्रमाणे तुम्ही करता आणि नंतर लक्षात येते की आपण सायबर क्राईमचा शिकार झालो आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सचा मार्ग सोपा होता. याच संधीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमची माहिती चोरून तिचा गैरवापर करु शकतात.
अशी चोरली जाते तुमची वैयक्तिक माहिती
जर हॅकर्सनी दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकमधूनच तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंग व्हायरस शिर आणि तुमचा फोनच हॅक होतो आणि मग तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा (फोटो / चॅटिंग / बँकिंग डिटेल्स) चोरले जातात आणि त्यानुसार मग आर्थिक अथवा भावनिक ब्लॅकमेल करून पैसे लुटले जातात. किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल केला तर त्यांच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला सांगा असं म्हटलं जातं. तुम्ही तो त्यांना दिला की दुसऱ्या मिनिटाला लक्षात येईल की तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लंपास केले गेले आहेत. कारण तुमचा फोन सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेला असतो. तेव्हा कृपया अशा कोणत्याही कॉलला किंवा मेसेजला अजिबात एन्टरटेन करू नका!
सावधगिरीचा उपाय
महत्त्वाचं म्हणजे कोणतीही टेलिकॉम कंपनी अशाप्रकारे मेसेज किंवा लिंकद्वारे 5G अपग्रेड करत नाही. सायबर क्राईमच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सोप्पा उपाय आहे. सायबर एक्सपर्ट ॲड. प्रशांत माळी यांनी सांगितलं आहे की, तुमचा नंबर (सिम कार्ड) ज्या कंपनीचे आहे. त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही स्वतः जा आणि त्यांच्याकडून तुमचे सिमकार्ड अपग्रेड करून घ्या. हे सर्वात सुरक्षित आहे. तुम्हाला कुणीतरी सांगितलं म्हणून स्वतःच ऑनलाईन पद्धतीने सिमकार्ड अपग्रेड करणे धोक्याचे आहे. 5G च्या नावाने होणाऱ्या या सायबर क्राईमपासून तुम्ही सावध राहा आणि तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांनाही याबाबत माहिती द्या.