Omraje Nimbalkar : सगळ्यांना वाटलं खासदार मॅरेथॉनचे रिबिन कापायला आले, पण थेट स्पर्धेत भाग घेतला; ओमराजे निंबाळकर एका तासात 21 किमी धावले
Omraje Nimbalkar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या फिटनेसबद्दल कायम सजग असतात. त्यांनी पंढरपुरातील मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन 21 किमीचे अंतर एका तासामध्ये पार केलं.
सोलापूर: राजकीय नेत्यांना धावपळ ही नित्याचीच असते, मात्र एखाद्या मॅरेथॉनसाठी राजकीय नेते धावतानाचे चित्र कधीतरीच पाहायला मिळते. ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) हे पंढरपुरातील एका मॅरेथॉनसाठी आले आणि त्यांनी 21 किमी धावून आपली फिटनेसही दाखवली.
रविवारी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या DVP मॅरेथॉनसाठी भल्या पहाटेपासून अनेक हौशी धावपटू दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पाटील हेही या मॅरेथॉनच्या आयोजनात होते. त्यांचे मित्र असणारे धाराशिवचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हेही या मॅरेथॉन शर्यतीच्या उदघाटन कार्यक्रमात दिसले. सगळ्याला वाटले ते केवळ फित कापायला आले आहेत. मात्र 21 किलोमीटरच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि खासदार ओमराजे यांनी इतर स्पर्धकांच्या सोबत धावण्यास सुरुवात केल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटले.
पहाटे साडेपाच वाजता हजेरी लावली
त्यामुळे पंढरपूर मॅरेथॉनमध्ये पहाटेपासूनच खासदार ओमराजे निंबाळकर हे चर्चेचा विषय ठरले होते. पहाटे साडेपाच वाजता मैदानावर उपस्थिती लावत खासदार ओमराजे यांनी सुरुवातीला वॉर्म अप कासरतीही केल्या. यानंतर पूर्ण 21 किलोमीटरचा ट्रॅक 1 तास आणि काही मिनिटात पूर्ण करत आपला फिटनेस दाखवून दिला.
आपल्या फिटनेसबाबत कायमच खासदार ओमराजे अलर्ट असतात. अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकलिंग अथवा रनिंग करतानाचे त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने ओमराजे यांना मेडल देऊन त्यांचा सन्मानदेखील करण्यात आला. यानंतर त्यांनी सेल्फी पॉईंटवर फोटोही काढून घेतला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असताना ओमराजे यांच्यासारखे त्यांचे खासदारही यासाठी फिजिकली सज्ज असल्याचे दिसून आले.
ही बातमी वाचा: