मानलं पैलवान तुम्हाला! स्वतः नकार देऊन वस्तादांची काढली हत्तीवरून मिरवणूक
Sikandar Shaikh : कुस्तीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचं राज्यभरात नाव गाजवणारा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आज आपल्या मूळ गावी म्हणजेच मोहोळमध्ये पोहचला.
सोलापूर : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) झाल्यानंतर पैलवान सिकंदर शेखची (Sikandar Shaikh) सोलापूरच्या (Solapur) मोहोळमध्ये जल्लोषत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पैलवान सिकंदर शेख यांचे जन्मगाव असलेल्या मोहोळमध्ये त्याची चक्क हत्तीवरून मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सिकंदर याने स्वतः हत्तीवर (Elephant) न बसता पहिले वस्ताद राहिलेल्या माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना हत्तीवर बसण्याची विनंती केली आणि मिरवणूक काढली. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.
कुस्तीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचं राज्यभरात नाव गाजवणारा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आज आपल्या मूळ गावी म्हणजेच मोहोळमध्ये पोहचला. यावेळी गावकऱ्यांनी सिकंदरचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. सोबतच सिकंदरची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात नियोजन करण्यात आलं. मात्र, यावेळी सिकंदर ने हत्तीवरून आपली मिरवणूक काढण्यास नकार दिला. तसेच, आपल्याला सर्वात आधी कुस्तीच्या आखाड्याची ओळख करून देणाऱ्या पहिले वस्ताद रमेश बारसकर यांना हत्तीवर बसवले. त्यानंतर गावभर मिरवणूक काढून गावकऱ्यांनी सिकंदरचे स्वागत केले. यावेळी गावातील तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. तसेच ठिकठिकाणी त्याचे स्वागत करण्यात आले.
गावकऱ्यांनी नेहमी साथ दिली
आज माझ्या जन्मभूमीत माझी मिरवणूक निघत असल्याचा आनंद आहे. याच गावात माझा जन्म झाला, शिक्षण झालं आणि याच गावात मी कुस्तीचे धडे घेतले. या गावाने मला मोठं केलं आहे. तू लढ आम्ही तुझ्यासोबत असल्याचं सांगत मला गावकऱ्यांनी नेहमी साथ दिली. रमेश बारसकर यांनी मला कुस्तीचा आखाडा दाखवला. पैलवानकी क्षेत्रात घालायचं आणि मी मोठं होणं याला फक्त बारसकर सर हेच कारण असल्याचं सिकंदर म्हणाला आहे.
हिंद केसरीसाठी प्रयत्न करणार...
ऑलिंपिकला खेळेल किंवा मेडल आणेल याबाबत आजच मी काही सांगू शकत नाही. मला माहित आहे, मी 92 किलोचा आहे. त्यामुळे पुढील महिन्यात असलेल्या हिंद केसरीसाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तसेच, बाहेर देशात खेळायचं आणि मेडल आणायचं यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचा सिकंदर म्हणाला आहे.
भारतीय संघाला शुभेच्छा...
आज ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात वर्ल्डकपचा फायनल सामना होत आहे. त्यामुळे भारतीय संघाला माझ्या शुभेच्छा आहे. तुम्ही आमची नाक आहात, त्यामुळे तुमचा विजय व्हावा अशाच माझ्या शुभेच्छा असणार असल्याचं सिकंदर म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या: