Solapur IT Raids : सोलापुरातही आयकर विभागाचे धाडसत्र, प्रसिद्ध रुग्णालयांची तपासणी केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
Solapur IT Raids : सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती सुरु आहे. सोबतच अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.
Solapur IT Raids : सोलापूर (Solapur) शहरात देखील आज (25 ऑगस्ट) सकाळपासून आयकर विभागाचे धाडसत्र (IT Raids) सुरु आहे. शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांची आयकर विभागाच्यावतीने चौकशी सुरु आहे. यासंदर्भात अद्याप तरी आयकर विभागाच्यावतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सकाळी सात वाजल्यापासून शहरात जवळपास सहा ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती आहे.
सोलापुरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती सुरु आहे. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.
सोलापुरातील आयकर विभागाचे वरीष्ठ अधिकारी बिपीनभाई पटेल यांच्या घरी ठाण मांडून बसले आहेत. सकाळपासून पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांची चौकशी सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र यासंदर्भात आयकर विभाग किंवा पटेल यांच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये पोहोचले आयकर अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
सोलापुरातील दोन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञांच्या रुग्णालयात देखील आज सकाळी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. यासंदर्भात डॉ. गुरुनाथ परळे यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी "मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही. मात्र आयकर विभागाचे अधिकारी आल्याचे समजले. मी सध्या सोलापुरात नाही," अशी प्रतिक्रिया डॉ. परळे यांनी फोनवरुन बोलताना दिली. तसेच सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ अनुपम शहा यांच्या हॉस्पिटलवर देखील आयकर विभागाने छापा टाकला. सकाळपासून आयकर विभागाचे पथक या ठिकाणी तपासणी करत आहेत.
रघोजी किडनी अँड मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये तपासणी
सोलापुरातील प्रसिद्ध रघोजी किडनी अँड मल्टीस्टेट हॉस्पिटलमध्ये देखील आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे. आज सकाळपासून रघोजी हॉस्पिटल येथे आयकर विभागाचे पथक तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रघोजी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आयकर विभागाच्या उभी असल्याचे चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात आयकर विभागाच्या वतीने प्रामुख्याने वेगवेगळ्या रुग्णालयांची तपासणी सुरू असल्याचे दिसतय. सोलापुरातील प्रसिद्ध आश्विनी रुग्णालय, कुंभारी येथे असलेले अश्विनी सहकारी रुग्णालय, स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल, डॉक्टर अनुपम शहा यांचे हार्ट क्लिनिक या ठिकाणी देखील आयकर विभागाचे पथक तपासणी करत आहे.
कृषी अभ्यास शिबिराचे फलक लावून दाखल झाले आयकर विभागाचे अधिकारी
मागील काही दिवसांपूर्वी जालन्यात स्टील व्यावसायिकांवर आयकर विभागाने कारवाई केली होती. या कारवाईसाठी जाताना आयकर विभागाचे अधिकारी जणू लग्नाच्या वरातीप्रमाणे गेले होते. वाहनांवर लग्नाचे स्टिकर लावून अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. आज महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबिराचे पोस्टर लावण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार जवळपास 24 पथकांद्वारे विविध ठिकाणी कारवाया सुरु आहेत. यामध्ये 50 गाड्या आणि शंभरहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
सोलापूर शहरात 'या' ठिकाणी आहेत आयकर विभागाचे पथक
बीपीन पटेल यांच्याशी संबंधित
1) मेहुल कन्स्ट्रक्शन
2) अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर
3) अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी
4) बिपीन पटेल यांच्या घरी
अन्य
5) डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
6) डॉ. अनुपम शाह हार्ट क्लिनिक
7) रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल
IT Raid in Maharashtra:महाराष्ट्रात 25 ठिकाणी आयकरची छापेमारी,अभिजीत पाटीलांच्या साखर कारखाना रडारवर
संबंधित बातम्या