(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : अतिवृष्टीमुळं तळकोकणात 183 हेक्टरवरील भात शेतीचं नुकसान, जिल्हा प्रशासनाचा राज्य सरकारला अहवाल
तळकोकणात अतिवृष्टीचा भात शेतीला (Rice Farming) मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तळकोकणात 183 हेक्टर भात शेतीचं नुकसान झालं आहे.
Agriculture News : सध्या राज्याच्या विविध भागात पावासानं (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. तळकोकणात देखील अतिवृष्टीचा भात शेतीला (Rice Farming) मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळं तळकोकणात 183 हेक्टर भात शेतीचं नुकसान झालं आहे. याबाबत सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला अहवाल दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर भातशेतीचं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टी मध्ये 250 गावे बाधित झाली आहेत. तर सुमारे दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जनावरे दगावली आहेत. या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे अहवाल पाठवला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अति मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 250 गावे बाधित झाली आहेत. तर 183 हेक्टर वरील भात शेतीचे नुकसान झालं आहे. 3 लाख 49 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच 14 सार्वजनिक मालमत्तेचे 18 लाख 7 हजार 200 रुपयांचे नुकसान झाले आहे, तर 338 पक्या घरांचे नुकसान झाले असून 13 पूर्ण घरे पडली आहेत.
पुराच्या पाण्यामुळं भात शेतीवर कीड रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात 146 हेक्टर, वेंगुर्ले 0.79 हेक्टर, कुडाळ 14.25 हेक्टर, देवगड 0.05 हेक्टर, वैभववाडी 0.65 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दीड कोटीचे नुकसान गेल्या तीन महिन्यांमध्ये झाले असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरु असून पुराच्या पाण्यामुळं भात शेतीवर कीड रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.
तिवृष्टीमुळं सुपारी पिकावर कोळे रोगाचा प्रादुर्भाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील शेकडो हेक्टर भातशेती अडचणीत आली आहे. भातशेती फुलोऱ्याला आली असताना कोसळत असलेल्या पावसामुळे परागीकरण होण्याच्या प्रकियेवर परिणाम होत आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं सुपारी पिकावर कोळे रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सुपारी अपरिपक्व असतानाच गळून पडत आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील भात आणि सुपारी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: