Satara Loksabha : साताऱ्यात शरद पवार गटाकडून उमेदवार अखेर ठरला? उदयनराजेंविरोधात 'या' नावावर शिक्कामोर्तब??
ज्या पद्धतीने महायुतीमध्ये उमेदवार कोण असणार? याची चर्चा रंगली आहे, अगदी त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडून सुद्धा सातारमध्ये उमेदवार कोण असणार? याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
![Satara Loksabha : साताऱ्यात शरद पवार गटाकडून उमेदवार अखेर ठरला? उदयनराजेंविरोधात 'या' नावावर शिक्कामोर्तब?? Sharad Pawar faction candidate in Satara finally decided know the Stamped on which name against udayanraje Bhosale shashikant shinde Satara Loksabha : साताऱ्यात शरद पवार गटाकडून उमेदवार अखेर ठरला? उदयनराजेंविरोधात 'या' नावावर शिक्कामोर्तब??](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/03/c40c60278cde8db2d87b2818f6e31efc1712130258142736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satara Loksabha : राज्यामध्ये अजून एकही उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही अशा जागेमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. त्यामुळे सातारा लोकसभेला उमेदवार कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सातारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने महायुतीमध्ये उमेदवार कोण असणार? याची चर्चा रंगली आहे, अगदी त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडून सुद्धा सातारमध्ये उमेदवार कोण असणार? याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
साताराची जागा ही शरद पवार गटाच्या वाट्याला असून उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. महायुतीकडून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत असली, तरी अजून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सातारमध्ये उमेदवारीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. दरम्यान, सातारा दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव खासदार श्रीनिवास पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राजकीय भूवया उंचावल्या गेल्या होत्या.
पवारांच्या ऑफरवर पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
यावेळी बोलताना त्यांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने अशी नावे चर्चेत असल्याचे सांगितले होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार बाळासाहेब पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी नकार दिल्याचे समजते. दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच शरद पवार यांनी मोठी खेळी करताना थेट माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनाच तुतारीच्या चिन्हावर लढवण्यासाठी गळ घातली होती. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली मात्र तुतारी चिन्हावर असमर्थता दर्शवल्यानंतर चर्चा पुढे जाऊ शकले नसल्याचे समजते.
त्यामुळे आता शरद पवार गटाकडून भक्कम उमेदवारांचा शोध सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शशिकांत शिंदे यांचे नाव समोर आल्याचे समजते. शशिकांत शिंदे यांनी आदेश आल्यास निवडणुकीसाठी तयारी दर्शवल्याचे समजते. दरम्यान, जयंत पाटलांनी शशिकांत शिंदे यांना तुम्हाला निवडणूक लढावी लागेल, असा निरोप दिल्याचे सुद्धा समजते. त्यामुळ सातारच्या रिंगणामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा मुकाबला रंगणार का? अशी सुद्धा चर्चा आहे.
आजच्या बैठकीत निर्णय होणार?
दरम्यान मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये सातारच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आज सातारच्या जागेवर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज तरी सातारच्या जागेची घोषणा होणार का? याकडे आता सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)