मोठी बातमी : उन्मेष पाटलांच्या हाती शिवबंधन! तिकीट कापलेले भाजप खासदार ठाकरे गटात दाखल
Jalgaon Lok Sabha Election 2024 : तिकीट कापलेले नाराज भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटात प्रवेश (UBT Shivsena) केला आहे. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थिती हा पक्षप्रवेश पार पडला आहे. भाजपने लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेष पाटील नाराज असल्याने ते ठाकरे गटात दाखल झाले आहेत. त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन
उन्मेष पाटील यांनी मंगळवारी थेट मुंबईत दाखल होत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांची बैठक झाली. त्यामुळे उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्यावर शिक्कामोर्तब झाला होता त्यानंतर त्यांचा आज शिवसेना ठाकरे गटात अधिकृत पक्षप्रवेश झाला आहे. जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
पक्षप्रवेशावर उन्मेश पाटील यांची प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला माझ्या कामाची किंमत नाही, एका भावाने दगा दिला असला तरी, दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत आहे, हा मला विश्वास असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटात सामील होत असल्याचं उन्मेष पाटील यांनी म्हटलं आहे.
एकच वादा उन्मेष दादा : संजय राऊत (Sanjay Raut on Unmesh Patil)
संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं की, एकच वादा उन्मेष दादा. उन्मेष पाटील, करण पवार यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. मीडियाने बातमी फोडली आहे. बातमी आता नवीन राहिली नाही. उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पारोळा नगराध्यक्ष करण पवार सुद्धा सेनेत दाखल झालेत. उन्मेष पाटील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते होते, पण तिथे निष्ठावंताची कदर नाही, म्हणून ते निष्ठावंत्यांच्या शिवसेनेत प्रवेश करताय.उन्मेष पाटील यांच्या प्रवेशाने जळगावची निवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल यात शंका नाही, असं राऊतांनी म्हटलंय.
वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Unmesh Patil)
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमचा सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करतो. तुमच्या-आमच्या भावना सारख्या आहेत. वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची वृत्ती आहे. उन्मेष पाटील तुम्ही प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे, तरी घाबरू नका. जे तिकडे गेले त्यांची ओळख खोके बाज म्हणून झाली आहे. आजपर्यंत आम्ही हा लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडत आलो, मात्र आता आपला खरा भगवा जळगावमध्ये फडकणार असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राला दिशा तुम्ही दाखवली आहे. सगळे शेपट्या घालणारे गुपचूप बसणारे नाहीत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
उन्मेष पाटील यांचं लोकसभेचं तिकीट कापलं
लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा लोकसभेसाठी तिकीट न मिळाल्याने उन्मेष पाटील नाराज होते. त्यामुळे नाराज उन्मेष पाटील यांनी मंगळवारी ठाकरे गटाचे नेत्यांची भेट घेतली. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती.
कोण आहेत उन्मेष पाटील? (Who is Unmesh Patil)
- उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप खासदार आहेत.
- या आधी त्यांनी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती.
- ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते.
पाहा व्हिडीओ : उन्मेश पाटलांचा भाजपला रामराम! ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश