Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांनी मागितलेली शिट्टी गेली स्वाभिमानीला अन् लिफापा आला वाटणीला!
उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार? याकडे सुद्धा लक्ष होते. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर या चिन्हांची मागणी केली होती.
सांगली : सांगली लोकसभेसाठी (Sangli Loksabha) बंडखोरी केलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आज (22 एप्रिल) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज माघार न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी आता तिरंगी लढत होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाविकास आघाडीतून चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर विशाल पाटील आक्रमक झाले आहेत.
विशाल पाटलांना लिफापा चिन्ह भेटलं
दरम्यान, उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यानंतर विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार? याकडे सुद्धा लक्ष होते. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज भरताना शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर या चिन्हांची मागणी केली होती. मात्र, विशाल पाटील यांनी मागणी केलेल्या तिन्ही चिन्हांपैकी एकही चिन्ह मिळालेलं नाही. त्यांना लिफाफा हे चिन्ह भेटलं आहे. दुसरीकडे, विशाल पाटील यांनी मागणी केलेलं शिट्टी चिन्ह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी हातकणंगलेतून आणि सांगलीमधील स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे हे शिट्टी या चिन्हावर रिंगणात असणार आहेत.
विशाल पाटील यांना निलंबनाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटील यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी माघार घेतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र, विशाल पाटील यांनी अर्ज माघार घेतलेला नाही. काँग्रेसकडून आघाडी धर्म सांभाळण्यासाठी विशाल पाटील यांना निलंबनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, विशाल पाटील यांनी दुर्लक्ष करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या