(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudan Crisis: सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीच्या साखर कारखान्यातील कामगारांचा मायदेशी परतीचा प्रवास सुरू, भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू
भारतीय दूतावास आणि केनाना शुगर कंपनीच्या माध्यमातून 95 कामगारांचा पहिली टीम पोर्ट सुदान या ठिकाणी आज सकाळी पोहोचली असून भारतीय वेळेनुसार अकरा वाजता जहाजातून ते भारताकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत.
Sudan Crisis: सुदानमध्ये (Sudan Crisis) अडकलेल्या केनाना शुगर येथील सांगली जिल्ह्यातल्या जवळपास 100 नागरिकांचा भारतीय नागरिकांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जवळपास 95 जणांची एक टीम सुदान मधून भारताकडे रवाना झाली आहे. भारतीय दूतावास आणि केनाना शुगर कंपनीच्या माध्यमातून 95 कामगारांचा पहिली टीम पोर्ट सुदान या ठिकाणी आज सकाळी पोहोचली असून भारतीय वेळेनुसार अकरा वाजता जहाजातून ते भारताकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. ऑपरेशन कावेरी अंतर्गत हे लोक मायदेशी परतत आहेत. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव तालुक्यातील अनेक लोक सुदानमध्ये नोकरीच्या निमित्ताने तर बहुतांश जण शुगर फॅक्टरीमध्ये कार्यरत होते.
सुदान मधील ग्रहयुद्धानंतर अडकलेल्या भारतीय नागरिकांच्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आलं होतं. मात्र युद्ध सुरू असलेल्या ठिकाणापासून जवळपास साडेचारशे किलोमीटर अंतरावर कॅनोन शुगर फॅक्टरी येथे महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे चारशेहून नागरिक अडकले होते. युद्धाच्या परिस्थितीमुळे येथील भारतीयांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होत. युद्ध वाढण्याची भीती निर्माण झाल्याने या सर्वांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.
केनाना शुगर फॅक्टरी मध्ये सांगली जिल्ह्यातील सुमारे 100 च्या आसपास कामगार वास्तव्यास होते. यातील नागरिकांनी सांगली जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीचे आमदार, अरुण लाड, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. तर भारत सरकारकडून युद्ध सुरू असणाऱ्या ठिकाणाहून प्राधान्यांना भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होतं. तर केनाना शुगर फॅक्टरी येथून एव्हेकेशन पॉईंट सुमारे 1200 किलोमीटर अंतर लांब असल्याने आणि या मार्गवर युद्धजन्य परिस्थिती असल्याने या मार्गवर अडचणीचं होतं. मात्र अखेर भारतीय दूतावास आणि केनाना शुगर कंपनीच्या माध्यमातून 95 कामगारांचा पहिली टीम पोर्ट सुदान या ठिकाणी आज सकाळी पोहोचली असून भारतीय वेळेनुसार अकरा वाजता जहाजातून ते भारताकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत.
इतर देशांचे भारताला सहाय्य
फ्रान्सने त्यांच्या हवाईदलाच्या सहाय्याने पाच भारतीय नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राजनैतिक सूत्रांनी दिली आहे. या भारतीयांना इतर देशातील नागरिकांसोबत फ्रान्सच्या वायूदलाच्या विमानतळावर उतरवण्यात आले. सौदी अरेबियाने देखील सांगितले की, त्यांचे जवळचे संबंध असलेल्या देशांच्या 66 नागरिकांना सुखरुपणे सुदानमधून बाहेर काढण्यात आले. यात काही भारतीयांचा देखील समावेश आहे.