(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut on Sangli Loksabha : कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली, सांगलीची सोडणार नाही, संजय राऊतांनी रणशिंग फुंकलं, ठाकरेंच्या सभेपूर्वी मिरज तापलं
पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती ताकदीने लढवावी, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार आता याची चर्चा रंगली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभेसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार? याची राजकीय उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रात शिगेला पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती ताकदीने लढवावी, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार आता याची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वी सांगली लोकसभा जागेवरील दावा प्रबळ केला आहे.
कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली
ते म्हणाले की कोल्हापूरची जागा आमची असताना सुद्धा ती आम्ही हसत हसत सोडली. याच्या आम्हाला यातना झाल्या. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहेत आपण सांगलीची जागा लढवूया. त्यांनी सांगितले की, आज (21 मार्च) सकाळी शरद पवार यांच्या चर्चा झाली. यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे प्रमुख नेते कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि तसेच त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
राजू शेट्टींवर काय म्हणाले?
दरम्यान, सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाकडे जाऊन श्रद्धांजली अर्पण करणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने बोलताना राजू शेट्टी यांच्याशी देखील चर्चा सुरू असल्याचे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखादी जागा असाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने ताकदीने लढवावी यामध्ये काही चुकीच असल्याचं मला वाटत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हा देशातील मोठा पक्ष असून महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. सर्व पक्ष येऊन एकत्र येत इंडिया आघाडी झाली आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड झारखंड याठिकाणी जागा मागत नाही. प्रादेशिक पक्ष आपला राज्यातील सीट मागतो आहे. त्यांचं अस्तित्व कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतं. ते पुढे म्हणाले की, भिवंडीबाबत आम्ही सगळे एकत्र आलो, तर ती जागा आम्ही भाजपकडून काढून घेऊ. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघेही भिवंडी जागेबाबत दावा करत आहेत.
वंचितवर काय म्हणाले?
संजय राऊत यांनी सांगितले की, बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली. त्यांनी चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे.