(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने गळ्याला दोरी लावून केला आयुष्याचा शेवट; मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील
Sangli : शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद कोळी हे चांदोलीत झोळंबी या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून ते पत्नीसह राहत होते.
सांगली : जिल्ह्यातील शिराळामध्ये वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी (वय 34, मूळ गाव बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. प्रमोद यांचा अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेलं नाही. प्रमोद यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले असून, ते अनुकंपाखाली भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. श्रीराम कॉलनीमध्ये राहणारे चांदोलीतील वनरक्षक प्रमोद पांडुरंग कोळी यांच्या बेडरुममध्ये पंख्याला कडी होती. नायलॉन दोरीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. याबाबत घर मालक दयानंद घोडके यांनी फिर्याद दिली.
शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद कोळी हे चांदोलीत झोळंबी या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून वनरक्षक म्हणून नोकरीस होते. श्रीराम कॉलनीत पाच महिन्यांपासून ते पत्नीसह राहत होते. सोमवारी रात्री आठनंतर ते बेडरुममध्ये काम करत बसले होते. त्यांची पत्नी प्रणाली बाजूच्या खोलीत झोपल्या होत्या. मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रणाली या प्रमोद यांना उठवण्यासाठी गेल्या असता बेडरुमच्या दरवाजाला आतून बराच वेळ आवाज देऊन कडी काढली नाही. त्यामुळे घरमालक घोडके यांना माहिती दिली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा फोडून काढला असता, आतमध्ये प्रमोद यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
मोबाईल स्टेटस ठेवत तरुणाची वारणा नदीत उडी
दरम्यान, जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्येच मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाने प्रेमकरणातून वारणा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील भेंडवडेमध्ये वारणा नदीपात्रात चौथ्या दिवशी सापडला होता. मयत तुषारचा मूळ ठिकाणापासून तब्बल 40 किमी दूर वारणा नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन वारणा नदीपात्रात पुराच्या पाण्यात उडी मारली होती.
मला शोधण्याचा प्रयत्न करु नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही
तुषार हा मूळचा बिळाशीचा होता. तो मांगलेमध्ये आजोळी आईसह रहात होता. तो मांगलेत खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. वारणा नदीत उडी मारण्यापूर्वी काही तास अगोदर त्याने मोबाईलच्या स्टेटसला मला शोधण्याचा प्रयत्न करु नको, मी झोकून दिले, कुठेही सापडणार नाही. तुझ्याच आठवणीत जगत राहिन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही, असा मजकूर ठेवला होता.
हेही वाचा
कोल्हापूर पोलीस दलातील 45 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; कळंबा जेलमधील नऊ कैद्यांना शिक्षेत सवलत