Lumpy Skin Disease : लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी
Lumpy Skin Disease : गाय व म्हैस वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 12 सप्टेंबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
Lumpy Skin Disease : राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 59 तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत गाय व म्हशींमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व चिकुर्डे या गावांमधील अनुक्रमे 4 लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरित गायी व एका लम्पी चर्मरोग सदृश्य बाधित संकरीत गायीमधील रक्त नाकातील स्त्रावाचे स्वॅब व अंगावरील नोड्यूलचे स्क्रॅपिंग नमुने प्रयोगशाळेतून लम्पी चर्म रोगाचे पाॅझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय व म्हैस वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 12 सप्टेंबरपासून 11 ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार शेतकरी / गोपालक यांना बाहेरच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून पशुधन खरेदी करणे व पशुधनाची/जनावरांची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. सांगली जिल्ह्याबरोबरच लगतच्या जिल्ह्यांमध्येही लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्याने जिल्ह्यातील जनावरांचे सर्व आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे.
तसेच जिल्ह्यातील इतर आठवडी बाजारांमध्येही जनावरांची खरेदी- विक्री व प्रदर्शन होत असल्यास, त्यालाही मनाई केली आहे. तसेच बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या