Islampur Vidhan Sabha constituency : जयंत पाटलांना घेरण्याचा महायुतीचा डाव, निशिकांत पाटलांचं तगडं आव्हान; इस्लामपूरमध्ये कुणाची बाजी?
Islampur Vidhan Sabha constituency : इस्लामपूरमधून जयंत पाटील हे आठव्यांदा आमदार होण्याच्या तयारीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विजयरथ रोखायचाच असा निश्चय महायुतीने केल्याचं दिसतंय.
Islampur Vidhan Sabha constituency : राज्याचं लक्ष लागलेल्या इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघात यंदा लक्षवेधी लढत होणार आहे. सातवेळा निवडून आलेले जयंत पाटील यंदा आठव्यांदा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच जयंत पाटील हे शरद पवारांच्या साथीने महाराष्ट्रभर प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे जयंत पाटलांसमोर एकच उमेदवार देत विरोधकांनी त्यांना मतदारसंघातच अडवून ठेवण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले आहेत. आता त्यांच्यासमोर भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेल्या निशिकांत पाटील यांचे आव्हान असणार आहे. 2019 साली निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळेच ही जागा शिवसेनेला न सोडता अजित पवारांनी आपल्याकडे घेत निशिकांत पाटलांना उमेदवारी दिली.
इस्लामपूर-वाळवा म्हणजे जयंत पाटलांचे होमग्राऊंड. या ठिकाणी कारखाना आणि अनेक सहकारी संस्था उभा करून जयंत पाटलांनी आपलं राजकीय नेटवर्क बळकट केलंय. सहकारी संस्था आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचा फायदा जयंत पाटलांना होतोय. त्या बळावरच जयंत पाटील हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतात.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिले. जयत पाटील हे शरद पवारांसोबत राहिल्याने आणि त्यांची बाजू सांभाळल्याने ते अजित पवारांच्या टार्गेटवर असल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच अजित पवारांनी जयंत पाटलांच्या मतदारसंघात प्रचार सभेचा धडाका लावल्याचं दिसतंय. पण अजित पवारांच्या सभांचा आपल्यावर काही परिणाम होणार नाही असा जयंत पाटलांचा दावा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले तर जयंत पाटील हे मुख्यमंत्री होतील या आशेने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचं दिसतंय.
2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?
2019 साली झालेल्या निवडणुकीत जयंत पाटलांना 1,15,563 मतं मिळाली होती. जयंत पाटलांनी 72,169 मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या गौरव नायकवडी यांनी 35 हजार मतं घेतली होती. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या निशिकांत पाटील यांनी 43 हजारांवर मतं घेतली होती.
ही बातमी वाचा: