(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : सांगलीत राजू शेट्टी अन् साखरसम्राटांचा संघर्ष अटळ; ऊस दरासाठी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत तोडगा नाहीच
Raju Shetti : कोल्हापूर फॉर्म्युलानुसार दत्त इंडिया कारखाना जाहीर करत नाही तोवर आम्ही जागा सोडणार नाही, अन्य कारखान्यावर देखील उद्यापासून आंदोलन सुरू होतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील ऊस दरावरची तातडीची बैठक देखील निष्फळ ठरली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत बहुतांश कारखानादाराचे चेअरमन गैरहजर राहिले. यामुळे बैठकीत काहीही ठोस न झाल्याने राजू शेट्टी देखील संतप्त झाले. कोल्हापूर फॉर्म्युलानुसार दत्त इंडिया कारखाना जाहीर करत नाही तोवर आम्ही जागा सोडणार नाही, अन्य कारखान्यावर देखील उद्यापासून आंदोलन सुरू होतील, असा इशारा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी कायम आहे. एफआरपी अधिक 100 मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना (swabhimani shetkari sanghatana) ठाम आहे. बैठक म्हणजे डोळ्यात केलेली धूळफेक असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
शंभर रुपये दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत इथून हटणार नाही
सांगली जिल्ह्यातील (Sangli News) ऊस दराचे आंदोलन आता आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे. साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रशासनाची बैठक पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता वसंतदादा कारखान्यासमोर गेल्या 30 तासांपासून सुरू असलेलं राजू शेट्टींचं ठिय्या आंदोलन हे कायम असणार आहे. जोपर्यंत एफआरपी अधिक शंभर रुपये दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत आता इथून हटणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी जाहीर केली.
आंदोलनाची आता वेगवेगळे टप्पे सांगली जिल्ह्यामध्ये घेतले जातील असेही राजू शेट्टी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी असेल, पालकमंत्री असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. साखर कारखानदारांना आलेली मस्ती जिरवण्याचा निर्णय घ्यावा लागेल,त्याचबरोबर आता आर या पारची लढाई सुरू झाल्याचे हे राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर विश्वजीत कदम यांच्या सोनहिरा कारखान्यावर देखील आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातलं ऊस दराचं आंदोलन भडकणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार
राजू शेट्टी म्हणाले की, आजची बैठक म्हणजे उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे. कारण या बैठकीला केवळ एकमेव चेअरमन हजर होते आणि त्यांनीही आपला कारखाना भाड्याने दिला आहे. त्यामुळे एक सुद्धा चेअरमन जो कारखाना चालवतो तो या बैठकीला हजर नव्हता, असे एकूण चित्र होतं. उर्वरित 16 पैकी केवळ आठ ते नऊ कारखान्याचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतर्मनाने विचार केला पाहिजे आणि सरकारने सुद्धा विचार केला पाहिजे.
हे सहकारी आणि खासगी कारखान्याचे चेअरमन स्वतःला समजतात काय? एक डिसेंबरपासून जिल्हाधिकारी या सर्व चेअरमन यांच्याबरोबर बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल व्यक्तिगत फोनवरून चर्चा करता येते, पण गेल्या 11 दिवसांमध्ये त्यांना बैठकीला त्यांच्या सोयीची वेळ जिल्हाधिकाऱ्यांना दिली नाही याचा सरळ अर्थ असा होतो ही शेतकऱ्यांनी ऊस पिकवावा आणि मुकाट्यांना आमच्या कारखान्याला घालावा, आम्ही देईल ते पैसे मुकाट्यांना स्वीकारावेत हे आम्हाला अजिबात मान्य नाही आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला.
पालकमंत्री गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत
जिल्ह्यात ऊस आणि द्राक्ष ही प्रमुख विकास असताना पालकमंत्र्यांनी या सगळ्यांना विचारायला पाहिजे होतं. जिल्ह्यामध्ये आंदोलना होत आहेत. परंतु, पालकमंत्री त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उद्यापासून या पालकमंत्र्यांचा निषेध करायला आम्ही सुरुवात करणार आहोत. कारण 15 दिवसापूर्वी त्यांच्या मतदारसंघातल्या एका पतसंस्थेच्या उद्घाटनावेळी आम्ही दोघे एकत्र असताना पालकमंत्र्यांच्या लक्षात मी आणून दिलं होतं.
कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय झाला, सांगली जिल्ह्याचा निर्णय होणे गरजेचे आहे आणि तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु त्यांनी काही पुढाकार घेतला नाही. कारखानदारांबरोबर चर्चा करण्याचा औचित्य दाखवलं नाही. हे कारखानदार जिल्हाधिकाऱ्यांना किंमत द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्याच कारखानदाराने शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि म्हणून उद्यापासून आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत.
इतर महत्वाच्या बातम्या