(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : गुन्हा मागे घेण्यासाठी इस्लामपुरात एकाचे डोकं फोडलं; सहा जणांच्या टोळक्याचे कृत्य
Sangli Crime : पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एकाचे दगडाने डोकं फोडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात बेघर वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून सहा जणांच्या टोळक्याने एकाचे दगडाने डोकं फोडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या राहुल थावरू राठोड (वय 27, रा. भुदरगड अपार्टमेंट, बेघर वसाहत) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सुनील मोहन चव्हाण, पूजा सुनील चव्हाण (रा. जयगड अपार्टमेंट), धनाजी माधू चव्हाण, हरी माधू चव्हाण, सीताबाई धनाजी चव्हाण, सुमन हरी चव्हाण (रा. भुदरगड अपार्टमेंट) अशा सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची पत्नी पल्लवीने सुनील चव्हाणचा भाऊ राहुलविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्याचा राग मनात धरून व तो गुन्हा मागे घेण्यासाठी सर्व हल्लेखोरांनी राहुल राठोठला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पूजा चव्हाणने दगडाने डोके फोडल्याने राहुल जखमी झाला.
सांगली जिल्ह्यात जवळपास 6 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये सण उत्सवाच्या आणि खास करुन गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांना नोटीसही दिल्या जात आहेत. जवळपास 6 हजार जणांवर या गणेशोत्सव (Ganeshotsav) काळासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सांगली पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 5 हजार गणपती मंडळाचा समावेश आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असली पाहिजे आणि त्यांच्यावर नियंत्रण असला पाहिजे यासाठी ही प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय ज्या मंडळांवर किंवा कार्यकर्त्यांवर या आधीचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशाही लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जेव्हा मंडळांना पोलिसांकडून परवानगी दिली जाते त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून 149 ची नोटीस देण्यात येते. आतापर्यंत अनेकांना तडीपारीच्या नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. या गुंडावर देखील गणेशोत्सव काळात कारवाई करण्यात येत आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या