पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडे न गेल्याने ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.

CM Relief Fund: ऑक्टोबर 2025 या अवघ्या एक महिन्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती 'आयटीआय'मधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी संदर्भात आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती. यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. साखर कारखान्यांना एक टन उसामागे 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे फर्मान महायुतीने सरकारने काढले होते. या संदर्भात मोठा वादही निर्माण झाला होता. असे असतानाही ही मदत शेतकऱ्यांकडे गेलेली नाही.
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीला १ अब्ज रुपयांची मदत; शेतकऱ्यांना दिले ७५ हजार…
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) December 10, 2025
नमस्कार मित्रांनो,
सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात अतिवृष्टीमुळे भयंकर मोठी पूरस्थिती निर्माण झालेली, उभा महाराष्ट्र त्यावेळेस हळहळला होता. शेतकऱ्यांना जो तो आपपल्या परीने मदत… pic.twitter.com/PyvxGryaRM
मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होऊन शेतकऱ्यांकडे न गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा खोचक सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा… pic.twitter.com/ieUmcmBCOB
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 11, 2025
सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही
दुसरीकडे, सतेज पाटील यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी पैसा गोळा केला असेल तर तो दिला गेला पाहिजे. आता काही तांत्रिक गोष्टीमुळे हे शक्य नाही ही पळवाट असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. इच्छाशक्ती असेल तर ते होतं. मात्र सरकारची इच्छाशक्ती दिसत नसल्याचे पाटील म्हणाले. जशी घोषणांची अतिवृष्टी झाली होती तशीच मदतीची सुद्धा अतिवृष्टी झाली पाहिजे असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























