Sangli News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जवळपास 6 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार, अनेकांना तडीपारीच्या नोटीस
Sangli News : गणेशोत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सांगितले.
सांगली : पुढील काही दिवसांमध्ये सण उत्सवाच्या आणि खास करुन गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सीआरपीसी 107, 110 आणि 144 कलमा अंतर्गत कारवाई केली जात आहे. त्यासोबतच 149 च्या नोटीस देखील गणेशोत्सव मंडळांना दिल्या जात आहेत. 149 अन्वये धाडण्यात आलेल्या नोटिसा पकडून जवळपास 6 हजार जणांवर या गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काळासाठी प्रतिबंधात्मक कारवाई सांगली पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 5 हजार गणपती मंडळाचा समावेश आहे.
रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर पोलिसांची नजर असली पाहिजे आणि त्यांच्यावर नियंत्रण असला पाहिजे यासाठी ही प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सांगितले. याशिवाय ज्या मंडळांवर किंवा कार्यकर्त्यांवर या आधीचे गुन्हे दाखल झाले असतील अशाही लोकांवर यामध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जेव्हा मंडळांना पोलिसांकडून परवानगी दिली जाते त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून 149 ची नोटीस देण्यात येते.
आतापर्यंत अनेकांना तडीपारीच्या नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायद हत्यार बाळगणे, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची यादी तयार करण्यात आली आहे. या गुंडावर देखील गणेशोत्सव काळात कारवाई करण्यात येत आहे. त्या सर्वांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. येणाऱ्या या आठवड्यामध्ये ही कारवाईची प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू
दरम्यान, जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने, निषेध, मोर्चा, गाव बंद, रॅली इ.प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण साजरे होणार असल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. विविध पक्ष/संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलन, उपोषण,मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी 20 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या