Ramdas Kadam : सोबत आलेल्या पक्षांना संपवायचं आहे का? काहीही झालं तरी रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही; रामदास कदमांनी भाजपला ठणकावलं
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : रायगड आणि रत्नागिरीही तुम्हालाच कसे पाहिजे असा प्रश्न विचारत शिवसेना रत्नागिरीची जागा सोडणार नाही असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले.
रत्नागिरी: महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले खरं, पण लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे त्यांच्यातील जागावाटपावरून होणारे मतभेद समोर येत आहेत. रत्नागिरीच्या (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election) जागेवर नारायण राणेंनी (Narayan Rane) दावा केल्यानंतर आता त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपला ठणकावलं आहे. रायगडही तुम्हालाच पाहिजे आणि रत्नागिरीही तुम्हालाच, असं कसं होईल? काहीही झालं तरी रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही असं त्यांनी भाजपला ठणकावलं आहे.
कोकणातील राजकारण पेटले
भाजपवर टीका करताना रामदास कदम म्हणाले की, रायगड लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर तुम्ही दावा सांगाल, तर आम्ही तसं होऊ देणार नाही. सोबत आलेल्या पक्षाला संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचं आहे का? 'आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नका लावू' अशी भाजपची भूमिका आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा या आधी शिवसेनेने लढली आहे, त्यामुळे ती जागा शिवसेनाच लढेल. शिवसेनेने जागा लढवावी, अशी माझी इच्छा आहे. पण निर्णय मुख्यमंत्री घेतील असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
उदय सामंतांचा दावा
रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचं गृहीत धरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी तयारी सुरू केली आहे. त्यानंतर ज्या जागेवर या आधी शिवसेना लढली होती त्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार लढवतील असं सांगत रत्नागिरीच्या जागेवर त्यांनी दावा केला.
नारायण राणेंचे प्रत्युत्तर
नारायण राणेंना यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजप स्वतःकडे ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच नारायण राणेंना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार हे राणेच असतील अशीही चर्चा होती.
उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर दावा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपच लढवेल असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 29, 2024
ही बातमी वाचा: