जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
महसूल जमिनीसंदर्भातील वादाच्या अनुषंगाने अर्जदार चौघुले यांनी PMOPG पोर्टलवर 07/01/2024 रोजी केलेली तक्रार विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग यांच्या बाबतीत असलेली नाराजी आणि तक्रार आता पुढे आली आहे. जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला खालच्या भाषेत आणि अर्वाच्य शब्द वापरून शिवीगाळ केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्याने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबतचं निवेदन उदय सामंत (Uday Samant) यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय महसूल कर्मचारी संघटनेला देखील त्यांनी याबाबतचा अर्ज दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात काय कारवाई केली जाणार? जिल्हाधिकारी यांनी शिव्या देण्याचं नेमकं कारण काय? असा सवाल सध्या कर्मचारी वर्गाकडून विचारला जात आहे. जिल्हाधिकारी (Collector) यांच्या या वागणुकीला कर्मचारी वैतागले होते, खासगीमध्ये याबाबतच्या तक्रारी आणि चर्चा होत होत्या. पण जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आता कर्मचार्याने थेट लेखी तक्रार दाखल केल्याने कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महसूल जमिनीसंदर्भातील वादाच्या अनुषंगाने अर्जदार चौघुले यांनी PMOPG पोर्टलवर 07/01/2024 रोजी केलेली तक्रार विभागीय कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांनी मला तुम सब लोग घंटा काम करते हो क्या भोसडीके, सब बेअक्कल है, हरामखोर, बदमाश अशा शब्दांचा वापर करुन मला कार्यालयात अपमानित केल्याचे महसूल कर्मचारी रोशन कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. कांबळे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांना याबाबत पत्र लिहून आपल्या स्तरावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही केली.
काय आहे विषय
खेड तालुक्याच्या तत्कालीन तहसिलदार प्रानकता घोरपडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मोजे लोटे ता.खेड जि. रत्नागिरी येथील गट क्रमांक व उपविभाग 84/6/11 क्षेत्र हे. आर 0-42-70 पोट खराबा हे. आर 0-02-90 एकूण क्षेत्र हे आर 0-45-60 या जमीन मिळकतीला दोबारा कुळ लावला असल्याने सदर लोकसेवकाची चौकशी करणेकामी समीती गठीत करावी व सदर लोकसेवकावर योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचा अर्ज जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे सैफ चौगुले, सचिव, ऑल इंडिया अंटी करप्शन कमिटी, महाराष्ट्र राज्य यांनी 15/06/2023 रोजी समक्ष सादर केलेला होता. त्याच विषयासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारदार गेले असता त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचं तक्रारदार कांबळे यांनी म्हटलं आहे.