Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच तासांपासून वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळील बावनदी येथे सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्सच्या मिनी बसचा भीषण अपघात झालाय.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (दि. 8 जून) सकाळी पावणेआठच्या सुमारास रत्नागिरीजवळील बावनदी येथे सीएनजी वाहून नेणाऱ्या टँकर आणि एका खासगी ट्रॅव्हल्सच्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावर सीएनजीची गळती झाली आणि हवेत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका घराला आग लागली असून, घराजवळ उभ्या असलेल्या रिक्षा व दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच त्या घरातील म्हैस भाजली आहे.
तर या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या चार ते पाच तासांपासून ठप्प आहे. अपघातात मिनी बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, या ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे शिक्षक रत्नागिरीत एका प्रशिक्षणासाठी येत होते. या अपघातात 30 जण जखमी झाले आहेत.
कशी घडली घटना?
सीएनजी टँकर मुंबईच्या दिशेने जात होता, तर खासगी ट्रॅव्हल्सची मिनी बस चिपळूणहून रत्नागिरीला येत होती. बावनदी परिसरात टँकरने ट्रॅव्हल्सला धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्सचा चालक गाडीवरील नियंत्रण गमावून बसला आणि ट्रॅव्हल्स सुमारे वीस फूट रस्त्याखाली कोसळली. या अपघातात सर्व प्रवासी जखमी झाले.
टँकरमधील सीएनजी टाकी गटाराशेजारी पडल्याने मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. हवेत पसरलेल्या सीएनजीला अचानक पेट लागल्याने आगीने एका घरालाही कवेत घेतले. सुदैवाने घरातील लोकांनी वेळेवर घराबाहेर धाव घेतल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
प्रशासनाची तत्काळ कारवाई
अपघाताच्या घटनेनंतर पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, टँकरमधील शिल्लक सीएनजी सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सकाळी पावणे नऊच्या सुमारास सुरू करण्यात आले. त्या दरम्यान महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवण्यात आली.
वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या चार ते पाच तासांपासून ठप्प आहे. संगमेश्वर आणि पाली मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आपल्या संपूर्ण पथकासह घटनास्थळी उपस्थित असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस आणि रेस्क्यू टीम संयुक्तपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
जखमींची नावे पुढील प्रमाणे
संतोष जागुष्टे (28), विराज राजाराम सावंत (41,रा.सावर्डे), मंदार सुखदेव खाडे(53), स्मिता मधुकर पाटील(48), उषा अमोल खुडे(38), जयश्री सुर्यकांत गावडे (54), प्रियंका दिलीप जाधव (38), स्नेहा संतोष मिस्त्री (47), धर्मेंद्र दत्तात्रय के देरुगडे (53), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे(53), सुलक्षणा संभाजी पाटील(40), निशिकांत दिनानाथवा वानरकर (51), रुपाली सुकांत यादव (50), हर्षाली हेमंत पाकळे (36), निता विनायक बांदरे (38), मिना सुभाष घाडगे (52), कमल किशोर महाडिक(37), प्रेमकुमार बबन शिवगण (35), अमोल गणेश कोनवाल(35), मनिषा संतोष कांबळे (47), मालिनी दिपक चव्हाण(40), श्वेता संजय चव्हाण(48), राजेश यादव(47),गणेश महादेव सावर्डेकर(45), सुरेंद्र दिपक सावंत(50), सचिन अशोक पोकळे(43),उदय पांडूरंग खताते(52), अरविंद अनंत सकपाळ (57), मिना विनायक शिरकर(38) आणि रोहित राजेंद्र चव्हाण(35) अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेत.
आणखी वाचा
























