भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
या भेटीमुळे जगदंबेच्या मनात निर्माण झालेला मोठा गैरसमज शिवा आपल्या सत्याने दूर करेल का, आणि हा दैवी प्रवास नेमका कसा घडेल, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली आहे.

Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका नव्या आणि अत्यंत आव्हानात्मक वळणावर येऊन पोहोचली आहे. आदिशक्तीची रचना, दैवी अवताराच्या मानवी मर्यादा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावभावनांचा गुंता यामुळे ही कथा अधिकच रंजक होत चालली आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये दैवी शक्तींच्या मानवी अवतारातील नातेसंबंध, त्यांच्यात निर्माण होणारा अविश्वास आणि त्यातून घडणाऱ्या रहस्यमय घटनांचं नाट्यमय मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कथेला नवे वळण मिळणार
शिवा आणि जगदंबा यांच्या नात्यात एका छोट्याशा भेटवस्तूच्या निमित्ताने मोठं वादळ निर्माण होणार आहे. ही भेटवस्तू केवळ एक साधी गोष्ट नसून, तिच्यात दडलेला अर्थ आणि त्या भेटीमुळे घडणाऱ्या घटनांची साखळी संपूर्ण कथेलाच नवं वळण देणार आहे. या भेटीमुळे जगदंबेच्या मनात निर्माण झालेला मोठा गैरसमज शिवा आपल्या सत्याने दूर करेल का, आणि हा दैवी प्रवास नेमका कसा घडेल, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढली आहे.
जगदंबेसाठी तिचे आई-वडील योग्य वर शोधत असताना, गंगाईला महिपती हा तिच्यासाठी लग्नासाठी योग्य वर वाटतो. मात्र महिपतीमुळेच जगदंबेच्या मनात शिवाबद्दल गैरसमज निर्माण होऊ लागतो. अजूनही जगदंबा शिवाच्या खऱ्या रूपापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. या परिस्थितीचा फायदा घेत असूयेमुळे महिपती शिवाने जगदंबेसाठी पाठवलेली भेटवस्तू बदलून टाकतो. या बदललेल्या भेटवस्तूचा परिणाम थेट जगदंबेच्या मनावर होतो आणि तिच्या मनात शिवाविषयी भीती व राग निर्माण होतो.
जगदंबा थेट शिवासमोर जाब विचारण्यासाठी उभी
आई गंगाई देखील नकळतपणे हा गैरसमज अधिकच घट्ट करते. परिणामी, जगदंबा थेट शिवासमोर जाब विचारण्यासाठी उभी राहते. मात्र शिवा शांतपणे सांगतो की त्यानं दिलेली खरी भेट पूर्णपणे वेगळी आहे आणि ती भेट जगदंबेला आधीच मिळाली आहे. शिवाच्या या विधानामागचा नेमका अर्थ काय आहे, आणि त्याच वेळी जगदंबेच्या घरात प्रकाशमान झालेल्या मण्याचं गूढ काय, हे आगामी भागांमध्ये उलगडणार आहे. दैवी शक्तींचा हा मानवी प्रवास, नात्यांमधील गैरसमज आणि सत्याचा उलगडा पाहण्यासाठी ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका दररोज रात्री ९ वाजता, फक्त आपल्या कलर्स मराठीवर पाहायला विसरू नका.























