मध्य रेल्वेला मराठी भाषेचं वावडं? मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचार्याने तिकीट नाकारल्याचा आरोप; नाहूर स्थानकावरील प्रकार
Nahur Railway Station: मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला, अशी जबरदस्ती करत तिकीट नकारल्याचा धक्कादायक प्रकार नाहूर रेल्वे स्थानकातील तिकिट खिडकीवरील कर्मचार्याने केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मराठीत तिकीट मागितले तर हिंदीतच बोला, अशी जबरदस्ती नाहूर रेल्वे स्थानकातील (Nahur Railway Station) तिकिट खिडकीवरील कर्मचार्याने केल्याच्या प्रकार समोर आला आहे. अमोल माने या प्रवाश्याशी हा संपूर्ण प्रकार घडला असून मराठी एकीकरण समितीने यात हस्तक्षेप करत रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी मराठीत बोलू लागले. मात्र त्या कर्मचाऱ्याने हिंदीत बोला, असे अमोल माने यांना सांगितले. मात्र मी मराठीतच बोलणार, असा आग्रह माने यांनी केला असता त्या कर्मचाऱ्याने उद्धट बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, याचा व्हिडिओ माने यांनी मोबाईलमध्ये काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याची रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार ही केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही आता मराठी एकीकरण समिती ने केली आहे.
नाहूर रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?
अमोल माने हे नाहूर स्थानकात लोकलचे तिकिट काढण्यास गेले असता तिथल्या कर्मचाऱ्याशी ते मराठीत बोलू लागले. मात्र तेथे असलेल्या कर्मचाऱ्ऱ्याने सांगितले की, मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीत बोला. दरम्यान, माने यावेळी म्हणाले की मी मराठीतच बोलणार. यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान या सर्व पप्रकरणाचा एक व्हिडिओ मराठी एकीकरण समितीने त्याच्या फेसबुकवर पोस्ट करत समोर आणला. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेचा अवमान होणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपल्या घरात हाल सोसते मराठी?
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. अगदी त्यावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडे मराठी भाषेबाबत तोंडभरून कौतुक करत मराठीचे महत्व पटवून दिलं. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे. या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानप्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेर आणि जगभरातील मराठी भाषिक समाजाचे अगदी सुरुवातीलाच अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. मात्र मराठी भाषेबाबत घडणारे असे प्रकार बघितले तर 'आपल्या घरात हाल सोसते मराठी? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे का, असेही बोलले जात आहे.
दरम्यान, याआधीही नालासोपारा इथं मराठी तिकीट तपासनीसाने मराठी जोडप्याची अडवणूक केल्याचा प्रकार घडला होता. मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या त्या तपासनीसाला व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निलंबित करण्यात आले होते. मुंबईत वारंवार मराठी माणसांचा अवमान करणारे प्रकार घडले आहेत. त्यात मराठी माणसाला नोकरी नाकारणे, मराठी माणसाला घर नाकारणे यासारखे प्रकार उघडकीस आले.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
