Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व खासदार तसेच देशातील बडे नेते उपस्थित राहिले.

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार यांच्यासह देशभरातील बडे नेते, खासदार एकवटले आहेत आणि त्याला निमित्त ठरलंय ते म्हणजे त्यांचा वाढदिवस. येत्या 12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मात्र त्या दिवशी शरद पवार हे मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. म्हणून दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्नेहभोजनासाठी उद्योगपती गौतम अदानीही उपस्थित राहिले आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व खासदार पोहोचले. तसेच मोदी सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि काही खासदारही उपस्थित राहिले आहेत.
Sharad Pawar Birthday : अजित पवारांची उपस्थिती
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्याची दोन शकले पडली, दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभारल्याचं दिसून आलं. परंतु, शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते, खासदार पवारांच्या घरी आल्याचं दिसून आलं.
Gautam Adani Meet Sharad Pawar : गौतम अदानी पवारांच्या निवासस्थानी
शरद पवारांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उद्योजक गौतम अदानी यांनी उपस्थिती लावली. त्याचसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, मनिष तिवारी यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित राहिल्याचं दिसून आलं.
Sharad Pawar New Delhi Residence : दिल्लीतील पवारांचे शेवटचं अधिवेशन?
या आधी राज्यसभेच्या कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांसाठी शरद पवार स्वतः स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच महाराष्ट्रातील एखाद्या खासदाराचा कार्यकाळ संपणार असेल तर त्याच्या स्नेहभोजनासाठी शरद पवार कार्यक्रम आयोजित करतात. आता शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ हा जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे शरद पवारांचे हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरण्याची शक्यता आहे. असं असलं तर, शरद पवारांनी जर मनात आणलं तर महाविकास आघाडी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊ शकतात अशी चर्चा आहे.
Maharashtra NCP : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांची सातत्याने भेट होताना दिसतेय. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींनी युती केल्याचं दिसून आलं.
ही बातमी वाचा:























