Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Thane Ghodbunder Road: गायमुख ते फाउंटन रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळवण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला तातडीने मिळवण्यासाठी ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकांनी एक समन्वय अधिकारी नेमून प्रकल्पाला गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दिले. या विषयाच्या अनुषंगाने विधिमंडळात बोलावलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे बोलत होते. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, यांच्या सह संबंधित विभागाचे सचिव, महापालिका आयुक्त उपस्थित होते.
मिरा भाईंदर आणि ठाणेकरांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या घोडबंदर ते फाऊंटन हॉटेल तसेच फाऊंटन हॉटेल ते गायमुख या रस्ताचे रुंदीकरण व विकासकामाना गती देण्यासाठी वनविभागाचा ना हरकत दाखला महत्त्वाचा आहे.
ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकांनी आपले प्रस्ताव वन विभागाकडे सादर केले आहेत. तथापि, वनविभागाने सुचविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी दोन्ही महापालिकांच्या वतीने समन्वय अधिकारी नेमुन त्या तातडीने दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली असून ती सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या प्रलंबित प्रस्तावांची स्थिती, अडचणी तसेच पुढील कार्यवाहीविषयी तातडीने कारवाई करावी अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
घोडबंदर रोडवरील घायमुख घाटातील रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखीचं कारण ठरला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्याच्या रुंदीकरणाची आणि काँक्रिटीकरणाची मागणी सातत्याने होत असल्याचं चित्र आहे. पण एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वादामुळे त्यावर पुढे काही कार्यवाही होत नसल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी याच रस्त्याच्या बांधकामावरुन एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना झापलं होतं. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात काही दिवसांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. पण हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा न करता डाबरी का केला असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. त्यावर वन विभाग या परिसरात सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता बांधण्यासाठी परवानागी देत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
त्यानंतर संतापलेल्या एकनाथ शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं. लोकांच्या जिवापेक्षा तुम्ही मोठे नाही, या ठिकाणी अपघात झाल्यास तुमच्यावर गुन्हा नोंद करून असा सज्जड दम शिंदे यांनी दिला होता.























