Who is Rupali Patil : फायरब्रँड नेत्या, बुलंद आवाज, कोण आहेत रुपाली पाटील?
पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिलाय. मात्र, रुपाली पाटील नेमक्या कोण आहेत?
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेच्या (MNS) पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil MNS) यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहून, आपण सर्व पदं सोडत असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाली ठोंबरेसारख्या महिला नेत्याने मनसे सोडल्याने पक्षासाठी हा मोठा झटका आहे. रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
रुपाली पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "मी राज ठाकरेंना पाहून राजकारणात आले, मला राजकीय वारसा नाही. लग्नाच्या आधीसुद्धा पक्षासाठी जेलमध्ये जाऊन आले, गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी काम केलं. माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरेंना वाईट बोलणार नाही, पण जी काही माझी खदखद आहे, ती व्यक्त केली आहे. मनसेमध्ये निस्वार्थी प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. बहीण म्हणून या परिवारात मी सोबत असेन. पण काही कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला. लोकांना न्याय देण्यासाठी खंबीर साथीची गरज असते, ते राज साहेबांना कळवलं आहे. त्यासाठी मी राजसाहेबांना वाईट बोलेन अशी मी स्वार्थी नाही, परंतु माझ्या कारणांमुळे पक्षाचा राजीनामा दिला आहे, बदल कोणाच्यात घडत नसेल तर मला स्वत:च्यात बदल करावा लागेल, राज ठाकरे माझे दैवत आहेत, आणि राहतील", असं रुपाली पाटील म्हणाल्या.
रुपाली पाटील यांच्या पत्रात नेमकं काय?
आदरणीय राजसाहेब ठाकरे
अध्यक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दिनांक : १४.१२.२०२१
सप्रेम जय महाराष्ट्र,
मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद व मा."श्री.राज ठाकरे" हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल.
जय महाराष्ट्र
आपली कार्यकर्ती
सौ.रुपाली पाटील ठोंबरे
कोण आहेत रुपाली पाटील? (Who is Raupali Patil Thombare)
रुपाली पाटील ठोंबरे या मनसेच्या फायरब्रँड नेत्या आहेत. पुणे मनसेचा आक्रमक आणि लढवय्या चेहरा म्हणून त्या ओळखल्या जातात. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तरुण-तरुणी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलं. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. 2017 मध्ये पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी गरोदर असून गल्ली बोळात प्रचार करुन त्यांनी लक्ष वेधलं होतं. महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यानच त्यांना प्रसव वेदना झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी मुलाला जन्म दिला होता.
मनसेचा बुलंद आवाज
गेल्या काही वर्षांपासून रुपाली पाटील या मनसेचा पुण्यातील बुलंद आवाज बनल्या. पुण्यातील मनसेची कोणतीही आंदोलनं असो, सामाजिक कार्य असो त्यामध्ये रुपाली पाटील यांची उपस्थिती लक्षवेधी होती.