बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांची अनोखी कारवाई, वाहतूक नियमांची आठवण करुन देणारा उपक्रम
नियम मोडणाऱ्या चालकांना टोल नाक्यावरील कार्यालयात प्रबोधन करणारे व्हिडीओ दाखवले जातायेत, तसेच लायसन्स काढताना जे वाहतुकीचे धडे दिले जातात.
पिंपरी-चिंचवड : महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांना चाप बसवण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातोय. तरी वाहन चालक शिस्तीचं पालन करताना दिसत नाहीत. पुणे-बंगलोर महामार्गावर काही अंतरात तेही अवघ्या काही मिनिटांत झालेल्या पाच अपघातांनी हे अधोरेखित केलं. म्हणूनच आता महामार्ग वाहतूक पोलिसांनी अनोख्या शिक्षेला सुरुवात केलीये. ही अनोखी शिक्षा चालकांचं प्रबोधन आणि जनजागृती करत आहे. महामार्ग पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर हा उपक्रम सुरू केलाय. त्यामुळे अतिघाईचा प्रवास करताना तुमचा अधिकचा वेळ वाया जाऊ शकतोय.
महामार्ग वाहतूक पोलीस बेशिस्त वाहनं चालवणाऱ्यांना आता चाप बसवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. त्याला कारण ही तसं आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना बेशिस्त वाहतुकीचा फटका बसला होता. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडीत फसले होते. त्यानंतर गृहराज्य मंत्र्यांनी महामार्ग वाहतूक पोलिसांच्या बैठका घेतल्या, शेवटी पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि पुणे-बंगलोर महामार्गावर ते स्वतः आले. तिथं महामार्ग पोलिसांना सूचना देत तातडीनं कारवाई करण्याचे सूचना दिल्या. तीनवेळा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द करण्याचेही संकेत दिले. यासाठी ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवे ही विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर कारवाईलाही वेग आला.
महामार्ग पोलिसांनी एक शक्कल लढवली आणि अनोखी शिक्षा शोधली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहतूक करणाऱ्या चालकांना उर्से टोल नाक्यावर रोखलं जातं. तिथं दंडात्मक कारवाई होते, त्याला जोडूनच आता या चालकांना एकत्रित केलं जातंय. त्या सर्वांना टोल नाक्यावरील कार्यालयात प्रबोधन करणारे व्हिडीओ दाखवले जातायेत, तसेच लायसन्स काढताना जे वाहतुकीचे धडे दिले जातात. त्याची आठवण इथे करून दिली जाते. त्यामुळे इथून पुढे अतिघाईचा प्रवास करताना प्रवाश्यांना जनजागृतीसाठी ही अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे.
सूरतहुन केरळला माल वाहतूक करत असलेला चालक मोहम्मद नवाज बेशिस्त वाहन चालवत होता. म्हणूनच महामार्ग वाहतूक पोलिसांनी त्याला उर्से टोल नाक्यावर रोखलं. त्यामुळे अतिघाईत निघालेल्या मोहम्मदवर दंडात्मक कारवाई तर झालीच पण सोबत त्याला पोलिसांचे भाषण ऐकावं लागलं. या जनजागृतीसाठी मोहम्मदचा अधिकचा वेळ वाया गेला. पण पोलिसांनी केलेलं प्रबोधन विसरणार नाही, शिवाय शिस्तीत वाहन चालवण्याचा त्याने निश्चय केलाय. घरी पोहचायला काही मिनिटांचा अवधी लागला तरी चालेल पण इथून पुढे नियमांचं पालन करेन. वाहतूक पोलिसांनी जनजागृतीसाठी हा घेतलेला वेळ आमच्या जीवासाठी महत्वाचा असल्याचं चालक अंजनी कुमार सांगतात.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनुसार गेली महिनाभर ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवे मोहीम राबवली जातीये. ही मोहीम संपताच 18 जानेवारी पासून पुढे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात होईल. त्याअंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जातायेत. हे प्रबोधन आणि जनजागृती त्याचाच एक भाग आहे.
संजय जाधव - महामार्ग पोलीस अधीक्षक, पुणे
बेशिस्त वाहन चालकांना अशी चित्रफीत आणि सूचना फलक दाखवून वाहतूक नियमांची आठवण करून दिली जातेय. वाहन चालकांचा वेळ वाया घालविण्याचा आमचा हेतू नाही. प्रत्येक प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित व्हावा पयासाठी आम्ही इथं चित्रफीत दाखवतो, सिम्बॉल दाखवून त्यांना वाहतुकीच्या नियमांची आठवण करून दिली जाते.
अमोल पोवार - पीएसआय, महामार्ग वाहतूक पोलीस
अति घाईचा प्रवास करताना वेग मर्यादा आणि लेन कटिंगचे उल्लंघन होते. परिणाम तुम्हाला दंडात्मक कारवाईला तोंड द्यावं लागतं. त्यात आता या अनोख्या कारवाईची भर पडली आहे. यातून तुमचं प्रबोधन आणि जनजागृती केली जाणारेय. त्यामुळे इथून पुढे केवळ 'अति घाई संकटात नेई' असं नव्हे तर 'अति घाई तुमचा वेळ ही घेणार' असं म्हणावं लागणार आहे. याच वेळेची तुम्हाला बचत करायची असेल तर वाहतुकीच्या नियमांचं पालन नक्की करा.