Baba Siddique: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी कारवाई, पुण्यातून आणखी दोघांना अटक; हल्लेखोरांच्या रूममध्येच मुक्काम
Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच बाबा सिद्दिकी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या रूममध्ये राहणाऱ्यांना तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना शनिवारी घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी (Baba Siddique)यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी संबधितांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. अशातच बाबा सिद्दिकी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या रूममध्ये राहणाऱ्यांना तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील वारजे (Warje, Pune) परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनु या दोन जणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आणखी २ जण धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार यांच्यासोबत राहत होते. सिद्दीकी यांची हत्या करणारे 3 तरुण हे वारजे परिसरातील बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये काम करत होते. हरीष नावाच्या ठेकेदाराने या सगळ्यांना एक रूम भाड्याने करून दिली होती. याच परिसरात असलेल्या या रूममध्ये हे 5 जण राहत होते. गुल्लू आणि मोनु यांचा काही या प्रकरणी काही सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. (Crime News)
त्याचबरोबर बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बहराइच येथून देखील दोघांना ताब्यात घेतले आहे. हरीष असे ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकाचे नाव असून, त्याच्या भंगार दुकानात धर्मराज आणि शिवप्रसाद गौतम पुण्यात काम करायचे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्याच्या काही दिवस आधी हरीषने शिवप्रसाद आणि धर्मराज यांच्यासाठी नवीन मोबाईल खरेदी केला होता आणि हरीषलाही या घटनेची पूर्ण माहिती होती.
सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची घरी काय सापडलं?
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, शिवकुमार उर्फ शिव गौतम अशी आहेत. तर चौथा आरोपीचं नाव मोहम्मद झिशान अख्तर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी २ सप्टेंबरपासून कुर्ल्यात वास्तव्य करत होते. १४ हजार रूपये भाड्याच्या खोलीत हे आरोपी वास्तव्य करत होते. बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट कुर्ल्यातील एका चाळीत या चार आरोपींमध्ये शिजला. गेल्या ४० दिवसांपासून हे आरोपी कुर्ल्यातील चाळीत राहून सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी करत होते. (Crime News)
बाबा सिद्दीकींची हत्या केल्यानंतर ते आरोपी प्रत्येकी ५० हजार रूपये वाटून घेणार होते. हरियाणातील कत्तर जेलमध्ये तिघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, मुंबईतील कुर्ला येथील पटेल चाळीत आरोपी राहत असलेल्या घराचे फोटो समोर आले आहेत. चाळीत फक्त तीन ते चार घरं आहेत, त्यामुळे आरोपींना पटेल चाळीची राहण्यासाठी निवड केली अशी माहिती देखील समोर येत आहे.