(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीईटी घोटाळ्यात नवा ट्वीस्ट, सुपेनंतर आणखी एका आरोपीकडून 24 किलो चांदी दोन किलो सोनं, काही हिरे जप्त
TET Exam Scam : तुकाराम सुपेकडे जवळपास पावणेचार कोटींचं घबाड जप्त केल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाला दुसऱ्या आरोपीच्या घरातून देखील मोठं घबाड सापडलं आहे.
TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात दररोज नवनवीन खळबळजनक माहिती बाहेर येत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. तुकाराम सुपेकडे जवळपास पावणेचार कोटींचं घबाड जप्त केल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरु येथील घरातून तब्बल 24 किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे.
दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रीतिश देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशी धक्कादायक माहिती समोर आली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आजी-माजी आयुक्तांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर याचे धागेदोरे थेट बंगळुरु येथील अश्विनकुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी त्याच्या बंगळुरु येथील निवासस्थानी पोहोचलं. या ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच
TET परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. आज सुपेकडून आणखी 5 लाख रुपये जप्त करण्यात आले. सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. गेल्या 24 तासात सुपेचे 62 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आणखी रक्कम हस्तगत होण्याची शक्यता आहे.
सुपेकडून पुणे पोलिसांनी तीन कोटी 93 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त
टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे आधीच मोठं घबाड सापडलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा निलंबित अध्यक्ष तुकाराम सुपेकडून काल 33 लाख रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत तुकाराम सुपेकडून पुणे पोलिसांनी तीन कोटी 93 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले. तुकाराम सुपेने हे पैसे 2018 आणि 2019 च्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारातून जमा केले आहेत. पोलिसांची कारवाई सुरु झाल्यावर सुपेने हे पैसे त्याच्या वेगवेगळ्या नातेवाईकांच्या घरी दडवून ठेवले होते. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सुपेने दडवलेले पैसै बाहेर येत आहेत. तुकाराम सुपेची शिक्षण विभागातील कारकीर्द आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे.
22 तारखेला तुकाराम सुपेंकडे 10 लाखांची रोकड मिळाली होती. सुपेंनी ही रोकड जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती. तीच रोकड त्या व्यक्तिनं आज पोलिसांच्या स्वाधीन केली. त्याआधी सुपेच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केली होती. तर पहिल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले होते. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.
म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले होते की, दोन पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली. यामध्ये सुपे आणि सावरीकरचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
- Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक
- MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त