पुण्यात लॉकडाऊनमध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार!
पुण्यातील तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये अकरावीची परीक्षा घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडगाव मावळच्या तहसीलदारांनी छापा टाकून महाविद्यालयाचे हे बिंग फोडले.
पुणे : लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच सर्व परीक्षा रद्द झाल्या. असं असताना पुण्याच्या तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अॅण्ड कॉमर्समध्ये परीक्षा सुरू असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वडगाव मावळच्या तहसीलदारांनी छापा टाकून महाविद्यालयाचे हे बिंग फोडले. तेव्हा अकरावी वाणिज्य विभागाच्या परीक्षा सुरू होत्या. तसेच याप्रकरणी संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा-महाविद्यालय बंद असताना आणि परिक्षांबाबत कोणताच निर्णय झाला नसताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तक्रार तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे आली होती. अकरावी वाणिज्य विभागात नापास झालेल्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती, अशी माहिती तळेगाव पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिली. आजच्या पेपरसाठी 33 विद्यार्थ्यांना व्हाट्सऍपवर मेसेज पाठवून परीक्षा असल्याची सूचना दिली, पैकी 27 विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास भाग पाडले. काल एक पेपर झाला तेव्हा प्रशासनाच्या कानावर ही बाब पडली. तसेच उद्या म्हणजेच आज ही पेपर होणार असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला होता. पेपर सुरू होताच पोलिसांच्या मदतीने तहसीलदारांनी छापा टाकला. तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मग याप्रकरणी संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे.
लॉकडाऊनदरम्यान बेरोजगारीची कुऱ्हाड, आयटी कर्मचाऱ्यांची 'जस्टिस फाॅर एम्प्लॉईज' मोहीम
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोरोना विषाणूमुळे जगभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांनी परिक्षा रद्द केल्या आहेत. राज्याने देखील पहिले ते पदवीच्या द्वितीय वर्षापर्यंत मुलांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात तळेगावमधील या विद्यालयाने केलेल्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या विद्यार्थ्यांपैकी एकाला जरी कोरोनाची लागण झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. एकप्रकारे अशा विद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
Supreme court | कोरोना बाधितांना दिली जाणारी वागणूक चिंताजनक : सुप्रीम कोर्ट